Join us

Maxwell vs Jadeja, IPL 2022 CSK vs RCB: मॅक्सवेलचा त्रिफळा उडवताच जाडेजाने केले 'गोली मार' सेलिब्रेशन; तुम्ही पाहिलात का Video

CSK कडून तिक्षणाने घेतले ४ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 16:09 IST

Open in App

Maxwell vs Jadeja, IPL 2022 CSK vs RCB: नवा कर्णधार रविंद्र जाडेजा याच्या नेतृत्वाखाली अखेर चेन्नई सुपर किंग्ज संघाने यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला. पहिले चारही सामने गमावलेल्या CSK ने बंगळुरू (RCB) संघाला २३ धावांनी पराभूत केले. शिवम दुबेच्या नाबाद ९५ आणि रॉबिन उथप्पाच्या ८८ धावांच्या बळावर चेन्नईने २० षटकात २१६ धावा केल्या. प्रत्युत्तरात RCBची वरची फळी अपयशी ठरूनही त्यांनी २० षटकात ९ बाद १९३ धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात रविंद्र जाडेजाने RCB च्या ग्लेन मॅक्सवेलला आपल्या जाळ्यात अडकवले. त्याला बाद केल्यानंतर जाडेजाने केलेलं सेलिब्रेशन विशेष चर्चेत राहिले.

कर्णधार फाफ डू प्लेसिस (८), अनुज रावत (१२) आणि विराट कोहली (१) हे RCB च्या वरच्या फळीतील फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल मैदानात आला. विकेट वाचवून खेळण्यापेक्षाही धावगती वाढवणे अधिक महत्त्वाचे असल्याने मॅक्सवेल तुफान फटकेबाजीला सुरूवात केली. पहिल्या ८ चेंडूत त्याने २१ धावा कुटल्या. त्यानंतर जाडेजा गोलंदाजीसाठी आला आणि त्याने तिसऱ्या चेंडूवर मॅक्सवेलला २६ धावांवर बाद केले. त्याची विकेट काढताच जाडेजाने हाताची बंदूक करून त्यातून गोळी मारल्यासारखे गोली मार सेलिब्रेशन केले. त्याचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला.

दरम्यान, मॅक्सवेल बाद झाल्यावर सुयश प्रभुदेसाई (१८ चेंडूत ३४ धावा), शाहबाज अहमद (२७ चेंडूत ४१ धावा) आणि दिनेश कार्तिक (१४ चेंडूत ३४ धावा) या तिघांनी फटकेबाजी केली. पण धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात त्यांना आपल्या विकेट्स गमवाव्या लागल्या. त्यामुळे त्यांना १९३ धावांपर्यंत मजल मारता आली आणि CSK ने सामना २३ धावांनी जिंकला.

टॅग्स :आयपीएल २०२२ग्लेन मॅक्सवेलरवींद्र जडेजाचेन्नई सुपर किंग्स
Open in App