IPL 2022 Rajasthan Royals vs Royals Challengers Banglore : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या बाजूने आज नशिबानेही उभं राहणं टाळले. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतरही RCBच्या फलंदाजांना अपयश आले. राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनीही कमाल केली. प्रसिद्ध कृष्णाने दुसऱ्याच षटकात विराट कोहलीची विकेट घेतली. त्यानंतर कुलदीप सेनने दोन चेंडूत फॅफ ड्यू प्लेसिस व ग्लेन मॅक्सवेलला माघारी पाठवले. आर अश्विननेही RCBला फिरकीच्या तालावर नाचवले आणि त्यात युजवेंद्र चहलने सुरेख रन आऊट केला.
विराटला अजही अपयश आले. दुसऱ्या षटकाच्या चौथा चेंडू प्रसिद्ध कृष्णाने बाऊन्सर टाकला. त्यावर पुल शॉट मारण्याचा प्रयत्न विराटचा फसला अन् चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने असलेल्या रियानच्या दिशेने गेले. रियाननेही सुरेख झेप घेत कॅच घेतली. ६व्या षटकात आर अश्विनने स्वतःच्या गोलंदाजीवर फॅफ ड्यू प्लेसिससा रिटर्न कॅच सोडला. पण, कुलदीप सेनने ( Kuldeep Sen) ७व्या षटकात फॅफला ( २३) माघारी जाण्यास भाग पाडले. जोस बटलरने कोणतीच चूक न करता झेल टिपला. कुलदीपने पुढील चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल (०) याला स्लिपमध्ये झेल देण्यास भाग पाडून RCBला मोठा धक्का दिला. त्याची हॅटट्रिक मात्र हुकली.
१३व्या षटकात शाहबाज अहमदला रन आऊट करण्याची सोपी संधी चहलने गमावली. पण, त्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर विचित्र रन आऊट पाहायला मिळाला. शाहबाजने मारलेला फटका प्रसिद्ध कृष्णाच्या हाती गेला. शाहबाजने क्रिज सोडले होते, ते पाहून नॉन स्ट्रायकर एंडवरील कार्तिकही धावला. पण, शाहबाजने त्याला माघारी जाण्यास सांगितले. कृष्णाने टाकलेला चेंडू चहलच्या हातून निसटला अन् कार्तिकला क्रिजवर पोहोचण्याची संधी मिळाली. पण, चहलने प्रसंगावधान दाखवून चेंडू यष्टिंवर आदळला.. हा निर्णय देण्यासाठी तिसऱ्या अम्पायरची मदत घ्यावी लागली.