IPL 2022 Rajasthan Royals vs Royals Challengers Banglore : राजस्थान रॉयल्सने पुण्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अवस्था पार वाईट केली. १४५ धावांचे माफल लक्ष्य पेलवताना RCBच्या दिग्गज फलंदाजांचा घाम निघाला. कुलदीप सेनने ( ४-२०) सलग दोन धक्के देत गेम चेंजर ओव्हर टाकली. प्रसिद्धी कृष्णानेही दुसऱ्याच षटकात विराट कोहलीची विकेट घेऊन RRला मोठे यश मिळवून दिले. आर अश्विनने १७ धावां ३ विकेट्स घेत RCBची मधली फळीच निष्क्रीय केली. युजवेंद्र चहलने प्रसंगावधान राखून दिनेश कार्तिकला रन आऊट करून माघारी पाठवून राजस्थानचा विजयाचा मार्ग सोपा केला. रियान परागने ( Riyan Parag) अर्धशतकासह क्षेत्ररक्षणात ( ४ कॅच) सुरेख योगदान दिले. राजस्थान रॉयल्सने सुरेख सांघिक खेळ करताना हा सामना जिंकला. आयपीएल २०२२मधील सर्वात कमी धावांचा यशस्वी बचाव करण्याचा विक्रम राजस्थानने नावावर केला. या विजयासह ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचले.
विराटला आजही अपयश आले. दुसऱ्या षटकाच्या चौथा चेंडू प्रसिद्ध कृष्णाने बाऊन्सरवर त्याला (९) बाद केले. ६व्या षटकात आर अश्विनने स्वतःच्या गोलंदाजीवर फॅफ ड्यू प्लेसिससा रिटर्न कॅच सोडला. पण, कुलदीप सेनने ( Kuldeep Sen) ७व्या षटकात फॅफला ( २३) माघारी जाण्यास भाग पाडले. जोस बटलरने कोणतीच चूक न करता झेल टिपला. कुलदीपने पुढील चेंडूवर ग्लेन मॅक्सवेल (०) याला स्लिपमध्ये झेल देण्यास भाग पाडून RCBला मोठा धक्का दिला. त्याची हॅटट्रिक मात्र हुकली.
१०व्या षटकात आर अश्विनने RCBच्या रजत पाटिदारचा ( १६) त्रिफळा उडवला आणि आयपीएलमधील ही त्याची १५०वी विकेट ठरली. असा पराक्रम करणारा तो ८वा गोलंदाज ठरला. १२व्या षटकात अश्विनने आणखी एक विकेट घेतली आणि सुयश प्रभुदेसाई (२) बाद झाल्याने RCBची अवस्था ५ बाद ६७ अशी झाली. १३व्या षटकात शाहबाज अहमदला रन आऊट करण्याची सोपी संधी चहलने गमावली. पण, त्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर विचित्र रन आऊट पाहायला मिळाला. त्यानंतर RCBच्या विकेट पडतच राहिल्या. कृष्णाने २३ धावांत २ बळी टिपले. वनिंदू हसरंगाचा ( १८) अडथळा कुलदीप सेनने दूर केला. बंगळुरूला ६ चेंडूंत ३० धावा करायच्या होत्या आणि त्यांची शेवटची जोडी मैदानावर होती. कुलदीप सेनने अखेरची विकेट घेत RCBचा डाव ११५ धावांवर गुंडाळाला. RR ने २९ धावांनी हा सामना जिंकला.
तत्पूर्वी, मोहम्मद सिराज ( २-३०), जॉश हेजलवूड ( २-१९) व वनिंदू हसरंगा ( २-२३) यांनी राजस्थान रॉयल्सला सुरुवातीला धक्के दिले. पण, रियान परागने ( Riyan Parag) संयमी खेळी करताना अर्धशतकासह RRला समाधानकारक पल्ला गाठून दिला ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेला जोस बटलर ( ७) आज अपयशी ठरला. देवदत्त पडिक्कलने (८) अपयशाचा पाढा कायम राखला. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या आर अश्विनने ( १७) चार चौकार खेचून चांगले संकेत दिले, परंतु मोहम्मद सिराजने त्याला माघारी पाठवला.
कर्णधार संजू सॅमसनकडून ( २७) अपेक्षा होत्या, परंतु वनिंदूने चतुराईने त्याला बाद केले. वनिंदूच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा संजूचा प्रयत्न फसला आणि वेगाने टाकलेल्या चेंडूने त्रिफळा उडवला. मिचेल ( १६) व रियान पराग यांनी ३१ धावांची भागीदारी केली. शिमरोन हेटमायर ( ३) पुन्हा फेल गेला. रियान परागने एकाकी झूंज देताना २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. परागने ३१ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५६ धावा केल्या. राजस्थानने ८ बाद १४४ धावा केल्या. त्याने हर्षल पटेलने टाकलेल्या २०व्या षटकात १८ धावा चोपल्या.