नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी मुख्य कोच राहिलेले माजी खेळाडू आणि प्रसिद्ध समालोचक रवी शास्त्री यांनी आगामी आयपीएलमध्ये पुन्हा समालोचनाकडे वळण्याची इच्छा व्यक्त केली होती. स्टार वाहिनीने त्यांचा पॅनलमध्ये समावेशही केला. तथापि, बीसीसीआयने त्यांना ही संधी नाकारताच शास्त्री चांगलेच भडकले आहेत.
बीसीसीआयच्या संविधानानुसार हे परस्पर हितसंबंध साधल्याचे (कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट) मानला जातो, असे सांगून बीसीसीआयने त्यांना समालोचन पॅनलमधून वगळले. शास्त्री हे राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत.
समालोचकाच्या भूमिकेत पुनरागमन करण्यासाठी ते उत्सुक होते. गेल्या पाच वर्षांत समालोचन करू न शकल्याने त्यांनी बीसीसीआयच्या नियमांवर बोट ठेवले आहे. ५९ वर्षांचे शास्त्री म्हणाले की, ‘आयपीएलचा हा १५ वा हंगाम आहे, मी याआधी ११ वर्षे समालोचन केले आणि नंतर गेल्या काही हंगामात ते करू शकलो नाही. कारण बीसीसीआयच्या घटनेतील काही मूर्ख नियमांनी आम्हाला बांधून ठेवले होते.’
रवी शास्त्रीशिवाय मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा चेन्नई सुपरकिंग्जचा माजी उपकर्णधार सुरेश रैनाही यंदा समालोचन करणार आहे. शास्त्री यांच्यासह रैनाला बोलंदाजी करताना पाहण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
‘सुरेश रैना खरंच मि. आयपीएल आहे’
शास्त्री म्हणाले की, ‘तुम्ही रैनाला मिस्टर आयपीएल म्हणता, याच्याशी मी असहमत होणार नाही. त्याने आयपीएलला ओळख मिळवून दिली. एका संघासाठी एकही सामना न गमावता सलग हंगाम खेळणे, ही एक मोठी गोष्ट आहे. स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी तो एक आहे.’