Join us  

Tim David IPL 2022 MI vs SRH Live Updates : टीम डेव्हिडच्या संघर्षावर मुंबई इंडियन्सने फिरवले पाणी; हैदराबादने थरारक विजय मिळवून राखले आव्हान

IPL 2022 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Updates : मुंबई इंडियन्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 11:29 PM

Open in App

IPL 2022 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Live Updates : मुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबाद यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा झाला. MI ने हैदराबादचे आव्हान जवळपास संपुष्टात आणले होते. १९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व इशान किशन यांनी धडाकेबाज सुरूवात करून दिली. पण, उम्रान मलिकने ( Umran Malik) त्यांची दाणादाण उडवली. टीम डेव्हिडने ( Tim David) १८ चेंडूंत ४६ धावा कुटून मुंबईला सामना आणून दिला. पण, त्याची विकेट पडली अन् भुवनेश्वर कुमारने १९वे षटक निर्धाव फेकून मॅच फिरवली. हैदराबादने ३ धावांनी सामना जिंकून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. 

१९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व इशान किशन यांनी दमदार सुरुवात करताना पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. या दोघांचा खेळ पाहून हिच जोडी SRHचा पराभव करेल असेच चित्र दिसत होते. पण, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पुन्हा एकदा रोहितला माघारी फिरावे लागले. तो ३६ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४८ धावांवर झेलबाद झाला. पुढच्या षटकात उम्रान मलिकने MIचा दुसरा ओपनर इशान किशन याला माघारी पाठवले. इशानने ४३ धावा केल्या.  

दोन्ही सेट फलंदाज माघारी परतल्यानंतर मुंबईवर थोडे दडपण आले. डॅनिएल सॅम्सने उत्तुंग फटके मारून ते कमी करण्याचे प्रयत्न केले. पण, उम्रान मलिक त्यांच्यासमोर मोठा अडथळा बनून उभा राहिला. १५व्या षटकात उम्रानने MIला आणखी एक धक्का देताना तिलक वर्माला ( ८) झेलबाद केले. त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर प्रियाम गर्गने अप्रतिम झेल टिपला आणि डॅनिएल सॅम्स १५ धावांवर माघारी परतला. कर्णधार केन विलियम्सनने संघातील अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारला गोलंदाजीला आणले आणि त्याने आणखी एक विकेट मिळवून दिली. टीम डेव्हिडने भुवीच्या यॉर्करवर सरळ फटका मारला, परंतु तोपर्यंत नॉन स्ट्रायकर त्रिस्तान स्तुब्ब्स पुढे आला होता. भुवीचा हात लागून चेंडू यष्टींवर आदळला आणि स्तुब्ब्स दुर्दैवीरित्या रन आऊट झाला.

टी नटराजनने आज दिशाहीन गोलंदाजी केली आणि टीम डेव्हिडने त्याचा फायदा उचलला. १८व्या षटकात त्याने चार षटकार खेचून २४ धावा कुटल्या. अखेरच्या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात नटराजनने त्याला रन आऊट केले. डेव्हिड १८ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४६ धावांवर माघारी परतला. मुंबईला १२ चेंडूंत १९ धावा करायच्या होत्या. भुवीने १९व्या षटकात संजय यादवला बाद केले. भुवीने १९वे षटक निर्धाव फेकले आणि मुंबईला ६ चेंडूंत १९ धावांचे आव्हान ठेवले. फझलहक फारूकीने १५ धावा दिल्या. मुंबईला ७ बाद १९० धावा करता आल्याने हैदराबादने ३ धावांनी बाजी मारली. 

प्रियाम गर्ग ( Priyam Garg) , राहुल त्रिपाठी ( Rahul Tripathi) आणि निकोलस पूरन ( Nicholas Pooran) यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी केली. अभिषेक ( ९)  तिसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर प्रियांम गर्ग व राहुल त्रिपाठी यांनी आक्रमक खेळ केला. गर्ग व त्रिपाठी यांची ४३ चेंडूंवर ७८ धावांची भागीदारी १०व्या षटकात संपुष्टात आली. गर्ग २६ चेंडूंत  ४२ धावांवर माघारी परतला. पूरन २२ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारासह ३८ धावांवर बाद झाला. त्रिपाठी ४४ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावांवर बाद झाला. पूरन व त्रिपाठी यांनी ४२ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी केली.  

डॅनिएल सॅम्स ( १-३९) व रिले मेरेडिथ ( १-४४) यांची चार षटकं महागडी ठरली. रमणदीप सिंगने ३ षटकांत २० धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. हैदराबादने ६ बाद १९३ धावा केल्या. जसप्रीतने  २०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरचा त्रिफळा उडवून मोठा विक्रम नावावर केला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २५० विकेट्स घेणारा तो भारताचा पहिला जलदगती गोलंदाज ठरला. या विक्रमात भुवनेश्वर कुमार ( २२३) व जयदेव उनाडकट ( २०१) हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.   

टॅग्स :आयपीएल २०२२सनरायझर्स हैदराबादमुंबई इंडियन्स
Open in App