Join us  

IPL 2022 MI vs GT Live Updates: दोन रन आऊट करत मुंबईनं सामना फिरवला; गुजरातच्या तोंडचा विजयाचा घास पळवला

IPL 2022 Mumbai Indians vs Gujarat Titans Live Updates: चुरशीच्या लढतीत मुंबईचा ५ धावांनी विजय; शतकी सलामी मिळूनही गुजरात पराभूत 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 11:31 PM

Open in App

मुंबई: आयपीएल 2022 मध्ये सुस्साट कामगिरी करत असलेल्या गुजरात टायटन्सलामुंबई इंडियन्सनं अटीतटीच्या सामन्यात पराभूत केलं आहे. मुंबईनं दिलेल्या 178 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातला ५ धावा कमी पडल्या. यष्टीरक्षक इशांत किशननं गुजरातच्या दोन महत्त्वाच्या फलंदाजांना चपळाईनं धावबाद केलं. या दोन विकेट्समुळेच सामना फिरला. शेवटच्या षटकात गुजरातला विजयासाठी 9 धावांची गरज होती. मात्र डेव्हिड मिलर मैदानात असूनही गुजरातला विजय मिळवता आला नाही.लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या गुजरातची सुरुवात जबरदस्त झाली. वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल यांनी शतकी सलामी दिली. दोघांनी शानदार अर्धशतकं झळकावली. मात्र फिरकीपटू अश्विननं एकाच षटकात दोघांना बाद करत मुंबईच्या आशा पल्लवित केल्या. यानंतर साई सुदर्शन हिट विकेट झाला. फटकेबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हार्दिक पांड्या आणि राहुल तेवतियाला यष्टिरक्षक इशान किशननं चपळाईनं बाद केलं. या दोन विकेट्समुळे सामना मुंबईच्या बाजूनं झुकला. शेवटच्या षटकात गुजरातला 9 धावांची गरज होती. तेवतिया आणि मिलर मैदानात असल्यानं गुजरातचं पारडं जड होतं. मात्र डॅनियल सॅम्सनं टिच्चून गोलंदाजी केली. त्यानं केवळ 3 धावा दिल्या. विशेष म्हणजे गुजरातचा संघ धावांचा पाठलाग करताना कधीही पराभूत झालेला नाही. मात्र मुंबईनं गुजरातला लक्ष्य गाठण्यापासून रोखलं.

इंडियन प्रीमिअर लीगच्या 15व्या पर्वातील आव्हान संपुष्टात आलेला मुंबई इंडियन्सचा संघ ( MI ) उशीरा चार्ज झालेला पाहायला मिळाला. पण, मधल्या फळीने घोळ केला. रोहित व इशान किशन यांनी मुंबईला दमदार सुरूवात करून देताना 74 धावांची भागीदारी करून दिली. रोहितने 28 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 43 धावा केल्या. इशान 29 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 45 धावांवर बाद झाला. अपयश किरॉन पोलार्डची पाठ काही सोडताना दिसत नाही. राशिद खानने अप्रतिम चेंडू टाकून पोलार्डची ( 4) दांडी गुल केली. सूर्यकुमार यादव ( 13) धावांवर बाद झाला. राशिदने त्याच्या 4 षटकांत 24 धावा देत 2 विकेट्स घेतल्या व 3 कॅचही टिपले. 

टीम डेव्हिड व तिलक वर्मा यांनी मुंबईचा गडगडत जाणारा डाव सावरला. या दोघांनी सुरेख फटकेबाजी मारली. डेव्हिडने 18व्या षटकात जोसेफला मारलेला स्ट्रेट सिक्स डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. 21 चेंडूंत 37 धावांची ही भागीदारी तिलक वर्माच्या ( 21) रन आऊट होण्याने संपुष्टात आली. डेव्हिड 21 चेंडूंत 44 धावांवर नाबाद राहिला. मुंबईने 6 बाद 177 धावा केल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्सगुजरात टायटन्स
Open in App