Join us

IPL 2022, Lucknow Super Giants Logo: केएल राहुलच्या 'लखनौ सुपर जायंट्स'ने बनवला झकास LOGO; भारतीय पुराणाशी आहे 'लोगो'चा खास संबंध! जाणून घ्या 'लोगो'मागची खास कहाणी

काही दिवसांपूर्वीच लखनौ संघाने आपलं नावंही सोशल मिडियाच्या माध्यमातून जाहीर केलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 18:38 IST

Open in App

IPL 2022च्या हंगामासाठी नव्याने सहभागी होत असलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाने आज आपल्या लोगोची खास झलक चाहत्यांना दाखवली. लखनौ संघ यंदाच्या वर्षी केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या संघात ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉननीस आणि भारताचा रवी बिश्नोई यांना केएल राहुलसोबत आधीच करारबद्ध करण्यात आलंय. या संघाने काही दिवसांपूर्वी आपल्या संघाच्या नावाची घोषणाही सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. त्यानंतर आज त्यांनी लोगोची झलक दाखवली.

लखनौ सुपर जायंट्सने सांगितलं की त्यांचा लोगो प्राचीन भारतीय पौराणिक कथांपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आला आहे. "गरुड हा पौराणिक पक्षी आहेत. तो संरक्षक असतो आणि वेगाने हवेत विहार करतो. त्याने गरूडाचे पंख असलेला लोगो आम्ही तयार केला आहे."

लखनौ सुपर जायंट्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ आहे. आरपी संजीव गोएंका ग्रुपने हा संघ ७,०९० कोटींना विकत घेतला आहे. लखनौने केएल राहुलची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. मेगा लिलावापूर्वीच केएल राहुलला १७ कोटींमध्ये करारबद्ध करण्यात आले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनीस ९.५ कोटींमध्ये तर पंजाबचा रवी बिश्नोई याला ४ कोटींमध्ये लखनौ संघाने करारबद्ध केलं आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर संघाचा मार्गदर्शक असणार आहे. तर झिम्बाब्वेचा माजी खेळाडू अँडी फ्लॉवर संघाचा प्रशिक्षक असणार आहे.

IPL 2022 हे यंदा दहा संघांमध्ये खेळण्यात येणार आहे. जुन्या आठ संघांव्यतिरिक्त लखनौ आणि अहमदाबादचा संघ नवीन असणार आहे. १२, १३ फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये या हंगामासाठी मेगा लिलाव होणार असून तेथेच संघातील इतर खेळाडू निश्चित होणार आहेत.

टॅग्स :आयपीएल २०२१लखनौ सुपर जायंट्सआयपीएल लिलावलोकेश राहुल
Open in App