IPL 2022, RCB Dressing Room Celebrations : राजस्थान रॉयल्सने विजयासाठी ठेवलेल्या १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा निम्मा संघ ८७ धावांवर माघारी परतला. RCBच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर पराभवाचे सावट जाणवत होते आणि काहींनी तर निराश होऊन स्टेडियम सोडण्यास सुरूवात केली. पण, दिनेश कार्तिक व शाहबाज अहमद यांच्या फटकेबाजीने वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले. जे चाहते घरी जाण्यासाठी स्टेडियमबाहेर पडले होते, त्यांना हा जल्लोष ऐकून पश्चाताप झाला असावा. कार्तिकने २३ चेंडूंत नाबाद ४४ आणि शाहबाजने २६ चेंडूंत ४५ धावांची खेळी करून RCBचा रोमहर्षक विजय निश्चित केला. यानंतर RCBच्या खेळाडूंनी ड्रेसिंग रुममध्ये जबरदस्त सेलिब्रेशन केलं.
RCBच्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे आणि यात कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिससह अन्य खेळाडू विजयी गाणं गाताना दिसत आहेत. ''The pants are red, the shirt is blue, the golden lion shining through, we're RCB we are playing bold, Go to the final, on our own,''असं हे गाणं आहे.
यशस्वी जैस्वाल ( ४) आणि कर्णधार संजू सॅमसन ( ८) हे वगळल्यास राजस्थानच्या देवदत्त पडिक्कल, जोस बटलर व शिमरोन हेटमायर यांनी सुरेख खेळ केला. बटलर व पडिक्कल या जोडीने मग ४९ चेंडूंत ७० धावांची भागीदारी केली. देवदत्त २९ चेंडूंत २ चौकार व २ षटकार खेचून माघारी परतला. बटलर व हेटमायर यांनी अखेरच्या १२ चेंडूंत ४२ धावा कुटल्या. बटलर ४७ चेंडूंत ६ षटकारांसह ७०,तर हेटमायर ३१ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४२ धावांवर नाबाद राहिला. राजस्थान रॉयल्सने ३ बाद १६९ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना फॅफ ड्यू प्लेसिस ( २९) व अनुज रावत ( २६) यांनी पहिल्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी करून दमदार सुरूवात केली. पण, त्यानंतर ५ विकेट्स पटापट पडल्या. ५ बाद ८७ अशा धावसंख्येवर RCB असताना दिनेश कार्तिक व शाहबाज अहमद ही जोडी जमली. अहमद २६ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४५ धावांवर बाद झाला. कार्तिकने नंतर RCBचा विजय पक्का केला. कार्तिक २३ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ४४ धावांवर नाबाद राहिला. RCBने हा सामना ४ विकेट्स व ५ चेंडू राखून जिंकला.