आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये फॅफ ड्यू प्लेसिसला संघात पुन्हा न घेतल्याचे दुःख कायम असताना चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) आणखी एक भरवशाचा माणूस प्रतिस्पर्धींनी पळवला. दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals ) मंगळवारी  त्यांच्या संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक म्हणून ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनच्या ( Shane Watson ) नावाची घोषणा केली आहे. ४० वर्षीय वॉटसन आता मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग, सहाय्यक प्रशिक्षक प्रविण आम्रे व अजित आगरकर व गोलंदाजी प्रशिक्षक  जेम्स होप्स यांच्यासोबत काम करणार आहे.  
 
या नियुक्तबद्दल वॉटसन म्हणाला, आयपीएल ही जगातील सर्वोत्तम लीग आहे. २००८ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून, त्यानंतर RCB व CSK संघाकडून खेळाडू म्हणून माझ्या मनात अनेक अविस्मरणीय आठवणी आहेत. आता प्रशिक्षक म्हणून आणखी आठवणी मला जमवायच्या आहेत. ग्रेट रिकी पाँटिंगच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळणे, हे भाग्य म्हणावे लागेल. कर्णधार म्हणून तो दिग्गज होताच आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा काम करता येणार आहे. तो जगातील सर्वोत्तम प्रशिक्षकांपैकी एक आहे. त्याच्यासोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.'' 
ऑस्ट्रेलियाच्या वन डे वर्ल्ड कप २००७ व २०१५ विजेत्या संघाचा वॉटसन सदस्य होता. २०१२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत तो प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट ठरला होता. त्याने १९० वन डे व ५८ ट्वेंटी-२० सामन्यांत ७०००हून अधिक धावा आणि २०० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व केले होते. २००८मध्ये राजस्थानसोबत, तर २०१८मध्ये CSKसोबत त्याने आयपीएल जेतेपदाची ट्रॉफी उचलली आहे. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये ३८७५ धावा व ९२ विकेट्स आहेत.