इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात सलग चार पराभवांनंतर गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने अखेर पहिल्या विजयाची नोंद केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात CSK ने २३ धावांनी विजय मिळवला आणि गुणखाते उघडले. शिवम दुबे ( नाबाद ९५) आणि रॉबिन उथप्पा ( ८८) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने विजयाचा पाया रचला. त्यानंतर माहीश थिक्साना व रवींद्र जडेजा यांनी अनुक्रमे ४ व ३ विकेट्स घेत विजय पक्का केला. यंदाची आयपीएल ही अम्पायरच्या निर्णयांमुळेही गाजतेय.. विराट कोहलीला दिलेला विचित्र आऊट असो किंवा अजिंक्य रहाणेला दिलेले तीन जीवदान, यामुळे अम्पायर चाहत्यांच्या टार्गेटवर आहेत. त्यात चेन्नई-बंगळुरू लढतीतही अम्पायरने विचित्र No Ball दिला आणि महेंद्रसिंग धोनी व अंबाती रायुडू स्तब्ध झाले.
RCBच्या डावातील १४व्या षटकात ड्वेन ब्राव्हो गोलंदाजी करताना अम्पायरने हा नो बॉल दिला. अम्पायरच्या या निर्णयावर नाराज झालेले धोनी व रायुडू जाब विचारायला पुढे सरसावले. या षटकाचा चौथा चेंडू अम्पायरने नो बॉल दिला. पण, ब्राव्होने क्रीजबाहेर पाऊल टाकले नव्हते किंवा त्याने बाऊन्सरही फेकला नव्हता, परंतु अम्पायरने तरीही नो बॉल दिल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. तेव्हा धोनी व रायुडू अम्पायरशी चर्चा करायला पुढे आले. अम्पायरने हा नो बॉल क्षेत्ररक्षणामुळे दिला. डाव्या बाजूच्या स्क्वेअर लेगला तीन खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी उभे केले गेले होत. MCCच्या नियमानुसार केवळ दोनच खेळाडू या दिशेला उभे करता येतात. त्यामुळे अम्पायरने हा नो बॉल दिला.