चेन्नई सुपर किंग्सचा रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) आणि शिवम दुबे या फलंदाजांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांना धु धु धुतले. मंगळवारी डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या लढतीत चेन्नईने २३ धावांनी विजय मिळवला. चार पराभवानंतर CSKचा हा पहिलाच विजय ठरला. या सामन्यात उथप्पा व दुबे यांनी १६५ धावांची विक्रमी भागीदारी केली. चौकार-षटकारांची आतषबाजी करणाऱ्या उथप्पाची विकेट मिळवण्यात RCBच्या मोहम्मद सिराजला यश आले आणि संपूर्ण संघ, त्यांचे फॉलोअर्स आनंदाने नाचू लागले. पण, त्यांचा हा आनंद क्षणिक ठरला. अम्पायरने उथप्पाला पुन्हा फलंदाजी करण्यास सांगितले आणि या निर्णयाने माजी कर्णधार विराट कोहली हैराण झाला.
CSKच्या डावातील १७व्या षटकात हे सर्व घडले. सिराजच्या चेंडूवर उथप्पाने टोलावलेला चेंडू सीमारेषेवर सुयश प्रभुदेसाईने टिपला. पण, तरीही विकेट नाही मिळाली. सिराजने क्रिज बाहेर पाय टाकल्याने अम्पायरने तो नो बॉल दिला आणि सर्व हैराण झाले. अशात विराटची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती.
ऋतुराज गायकवाड ( १७) व मोईन अली ( ३) झटपट माघारी परतल्याने चेन्नईची अवस्था २ बाद ३६ अशी झाली. रॉबिन उथप्पा व शिवम दुबे यांनी ७४ चेंडूंत १६५ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या फटकेबाजीमुळे चेन्नईने अखेरच्या १० षटकांत १५०+ धावा कुटल्या. उथप्पा ५० चेंडूंत ४ चौकार व ९ षटकारांसह ८८ धावांवर बाद झाला. दुबे ४६ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकारांसह ९५ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईने ४ बाद २१६ धावा केल्या. माहीश थिक्सानाने RCBला ३३ धावांत ४, रवींद्र जडेजाने ३९ धावांत ३ धक्के दिले. ग्लेन मॅक्सवेल २६ धावा, सुयष प्रभुदेसाई १८ चेंडूंत ३५ व शाहबाज अहमद २७ चेंडूंत ४१ धावा केल्या. दिनेश कार्तिकने १४ चेंडूंत ३४ धावा केल्या. पण, आरसीबीला ९ बाद १९३ धावांवर समाधान मानावे लागले.