Join us  

Devon Conway IPL 2022, CSK vs DC Live Updates : डेवॉन कॉनवे, ऋतुराज यांनी मजबूत पाया रचला, MS Dhoniने दमदार ट्रेलर दाखवला! 

IPL 2022, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Updates : चेन्नई सुपर किंग्सचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांनी आणखी एक शतकी भागीदार केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2022 9:29 PM

Open in App

IPL 2022, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Updates : चेन्नई सुपर किंग्सचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांनी आणखी एक शतकी भागीदार केली. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचा या दोघांनी चांगला  समाचार घेतला. ऋतुराजचा आजचा खेळ तुलनेने थोडा संथ होता, परंतु कॉनवे सुसाट सुटला. दोघांनी मजबूत पाया रचल्यानंतर CSK च्या पुढच्या फलंदाजांना फटकेबाजी करणे सोपं झालं. शिवम दुबेनेही या आतषबाजीत हात साफ केले. महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) अल्पशा खेळीत दमदार ट्रेलर दाखवला.

ऋतुराज गायकवाड व डेव्हॉन कॉनवे यांनी CSK ला दमदार सुरूवात करून दिली. दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेताना या दोघांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये ५७ धावा जोडल्या. आयपीएल २०२२मधील ही त्यांची तिसरी ५०+ भागीदारी आहे. या जोडीला रोखण्यासाठी रिषभ पंतने प्रमुख गोलंदाज कुलदीप यादवला पाचारण केले, परंतु कॉनवेने त्याला चांगले झोडले. कॉनवेने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे सलग तिसरे अर्धशतक ठरले. या दोघांनी ९च्या सरासरीने धावांचा ओघ सुरू ठेवला होता. कुलदीपच्या पुढील षटकात कॉनवेने सलग तीन चौकार खेचले. कुलदीपने २ षटकांत ३४ धावा दिल्या.  एनरिच नॉर्खियाने दिल्लीला पहिले यश मिळवून दिले. ऋतुराज व कॉनवे यांची ११० धावांची भागीदारी त्याने संपुष्टात आणली. ऋतुराज ३३ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ४१ धावांवर माघारी परतला. विकेटनंतर कॉनवेची फटकेबाजी थांबली नाही. तो DC च्या गोलंदाजांवर प्रहार करतच राहिला. मोईन अलीला तिसऱ्या क्रमांकावर न पाठवता CSK ने शिवम दुबेला पाठवले. रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे दुबेचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याने सुरूवात संथ केली, परंतु जम बसल्यावर तोही फटकेबाजी करू लागला. १६व्या षटकात शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर दुबेने ६,६,४ अशी फटकेबाजी केली. 

पुन्हा एकदा डेवॉन कॉनवेला शतकाने हुलकावणी दिली. ४९ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह तो ८७ धावांवर खलिल अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. कॉनवे व दुबे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३३ चेंडूंत ५९ धावांची भागीदारी केली. खलिलने टाकलेल्या त्या १७व्या षटकात १ विकेट व ३ धावा आल्या. १८व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मिचेल मार्शने  CSKचा सेट फलंदाज दुबेला बाद केले आणि महेंद्रसिंग धोनीचे ( MS Dhoni) आगमन होताच स्टेडियम दणाणून निघाले. दुबेने १९ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३२ धावा केल्या. पहिला चेंडू सावध खेळल्यानंतर धोनीने पुढील चेंडूवर पुढे येत खणखणीत षटकार खेचला, नंतर गॅपमधून चौकार काढला. १९व्या षटकात जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात अंबाती रायुडू ( ५) बाद झाला.

धोनीने अखेरच्या षटकांत काही दमदार फटके मारून प्रेक्षकांना खुश केले. नॉर्खियाने २०व्या षटकात सलग दोन विकेट घेत चेन्नईच्या धावसंख्येवर अंकुश लावला. त्याची हॅटट्रिक ड्वेन ब्राव्होन पूर्ण होऊ दिली नाही. चेन्नईने ६ बाद २०८ धावा केल्या. धोनी ८ चेंडूंत २१ धावांवर नाबाद राहिला. (पाहा IPL 2022 - CSK vs DC सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड) 

टॅग्स :आयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्समहेंद्रसिंग धोनीऋतुराज गायकवाड
Open in App