Join us  

IPL 2021: संजू सॅमसनने ऋषभ पंतपासून बोध घ्यावा; सेहवाग यशस्वी का ठरला याचाही विचार करावा

सॅमसनने ऋषभ पंतचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवायला हवे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 12:01 AM

Open in App

- अयाज मेनन

संजू सॅमसनने यंदाच्या मोसमात आतापर्यंत आपल्या चाहत्यांना आनंदही दिला आणि निराशही केले. राजस्थान रॉयल्सतर्फे पंजाबविरुद्धच्या सलामी लढतीत शानदार शतकी खेळीत संघाला २२१ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना जवळजवळ विजय मिळवून दिला होता. पण, त्यानंतरच्या तीन लढतींमध्ये मात्र त्याला केवळ सर्वाधिक २१ धावा करता आल्या. त्यात दोन सामन्यात तो एकेरी धावसंख्येत बाद झाला.

सर्वोत्तम खेळाडूसोबतही हे घडू शकते. पण संजूच्या बाबतीत तसे म्हणता येणार नाही. तो या तिन्ही डावात केवळ चुकीचा फटका खेळून बाद झाला आहे आणि त्यामुळे त्याचा संघ अडचणीत आला. शानदार सुरुवातीनंतर सॅमसन अपयशी ठरल्याचे प्रथमच घडलेले नाही. त्याच्या आयपीएल कारकिर्दीत वारंवार हे घडल्याचे दिसून येते. सुरुवातीच्या एक-दोन सत्रात भारतातील युवा प्रतिभावान खेळाडू म्हणून त्याने लक्ष वेधले होते.

उत्तम ‘हँड-आय कॉर्डिनेशन’ आणि त्याच्या जोडीला यष्टिरक्षण असल्यामुळे सॅमसन लक्षवेधी ठरला होता. तंत्रापेक्षा संयम सॅमसनसाठी महत्त्वाची अडचण आहे. गोलंदाजांवर वर्चस्व गाजवणे चुकीचे नाही. क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांनी ते सिद्ध केले आहे. आधुनिक काळात क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारात ते गरजेचे आहे. पण, त्याचसोबत खेळाच्या परिस्थितीची माहिती, फटक्यांची निवड याला अधिक महत्त्व आहे. यात सॅमसन सपशेल अपयशी ठरला आहे.  माजी भारतीय सलामीवीर फलंदाज सुनील गावसकर व गौतम गंभीर यांनी सॅमसनवर टीका केली आहे. गावसकर यांनी तर त्यामुळेच सॅमसनला भारतीय संघात स्थान टिकविता आले नसल्याचे म्हटले आहे. टीका कठोर आहे, पण खरी आहे.

आक्रमक युवा फलंदाज नेहमी ‘सेहवाग स्कूल’मधील असल्याचे बोलतात. सेहवागच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये शानदार स्ट्राईक रेट व कामगिरीत सातत्य होते. त्याची फटक्यांची निवड, सामन्याचे आकलन करण्याची क्षमता, शानदार होती. बाहेरून बघताना सेहवाग गोलंदाजांविरुद्ध चान्सेस घेतो असे वाटायचे, पण त्याने केलेल्या सर्वोच्च खेळींचा विचार केला तर त्याने गोलंदाजांवर वर्चस्व गाजवल्याचे दिसून येते. त्याचा विचार केला तर सॅमसन सेहवागच्या एकदम विरुद्ध भासतो. सॅमसनने केवळ त्याचा रोल मॉडेलप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न न करता तो का यशस्वी ठरला, याचाही विचार करणे आवश्यक आहे.

सॅमसनने ऋषभ पंतचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवायला हवे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापूर्वी पंतची मानसिकताही काही अंशी अशीच होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंतला काही काळ संघाबाहेर ठेवल्यानंतर तो भारताचा सर्वोत्तम फलंदाज व मॅचविनर ठरला आहे. त्याने आक्रमकतेला मुरड घातली म्हणून तो यशस्वी ठरला नाही तर त्याने योग्य फटक्यांची निवड करण्यावर लक्ष केंद्रित केले. सध्या पंत भारतीय संघात तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक फलंदाज आहे. त्यामुळे सॅमसनने पंतच्या पुस्तकातून धडे घ्यायला हवेत. त्यामुळे त्याची कारकीर्द बहरण्यास मदत मिळेल.

 

टॅग्स :संजू सॅमसनरिषभ पंतआयपीएल २०२१