दुबई : ‘खेळाच्या मैदानावर प्रत्येक खेळाडूचा दृष्टिकोन वेगळा असतो. प्रत्येक खेळाडू आपापल्या पद्धतीने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. मॉर्गन आणि माझी बाचाबाची झाली असली, तरी आमच्यात वैयक्तिक लढाई नव्हती. खेळ कसा खेळला जावा, याबाबत आमच्यातील दृष्टिकोनाचा हा फरक होता,’ असे सांगत दिल्ली कॅपिटल्सचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याने कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार इयॉन मॉर्गनसोबत झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
गेल्या आठवड्यात झालेल्या दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्यात चेंडू ॠषभ पंतच्या हाताला लागून गेल्यानंतर अश्विनने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. यावरून मॉर्गन आणि अश्विनमध्ये बाचाबाची झाली होती. मॉर्गनने अश्विनवर अखिलाडूवृत्तीचा आरोप लावला होता. यावर अश्विनने म्हटले की, ‘माझ्यामते ही नक्कीच वैयक्तिक लढाई नव्हती. मी कधीच मैदानावरील वादाकडे या दृष्टीने पाहतही नाही. जे लोक याकडे अधिक लक्ष वेधू इच्छितात, त्यांना मी रोखू शकत नाही. मला माहीतही नव्हते की, चेंडू पंतला लागून गेला आहे. शिवाय त्यांनी जे शब्द वापरले, ते योग्य नव्हते.’ अश्विनने यानंतर ट्विटरद्वारेही मॉर्गन आणि टिम साऊदी यांना अपशब्दांचा वापर न करता खिलाडूवृत्तीचा धडा न शिकविण्याबाबत सुनावले होते.