नवी दिल्ली : केरळचे प्रतिनिधत्व करणारा २६ वर्षीय यष्टिरक्षक फलंदाज अझहरुद्दीनने अलीकडेच सैयद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत एक आक्रमक खेळी केली होती. अझरुद्दीनच्या १३७ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर केरळ संघाने २१४ धावा केल्या होत्या. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील लिलावात या फलंदाजावर फ्रँचायझीची विशेष नजर राहणार आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये मोहम्मद अझरुद्दीन या नावाची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. माजी भारतीय कर्णधार व शैलीदार फलंदाजीसाठी ते प्रसिद्ध होते. आता याच नावाने एक नवा स्टार भारतीय क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण करीत आहे. हा फलंदाज शैलीदार नव्हे तर आक्रमक फलंदाजीमुळे चर्चेत आहे. या महिन्यात होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावामध्ये सर्व फ्रँचायझींची नजर त्याच्यावर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
केरळतर्फे खेळणाऱ्या २६ वर्षीय यष्टिरक्षक फलंदाज अझरुद्दीनने अलीकेडच संपलेल्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आक्रमक खेळी केली होती.
या स्पर्धेत त्याने १७ चौकार व १५ षटकार लगावले. मुंबईविरुद्ध केवळ ३७ चेंडूंमध्ये त्याने शतक ठोकत क्रिकेट वर्तुळाला पुन्हा एकदा दखल घेण्यास भाग पाडले.
३७ चेंडूंमध्ये ठोकले शतक
वानखेडे स्टेडियममध्ये १३ जानेवारीला खेळल्या गेलेल्या एलिट गट ‘ई’च्या लढतीत त्याने केवळ २० चेंडूंमध्ये अर्धशतक व ३७ चेंडूंमध्ये शतक झळकावले. त्याचसोबत सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केरळतर्फे शतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला. तो या स्पर्धेत दुसरा सर्वांत वेगवान शतक ठोकणारा खेळाडू ठरला. सर्वांत आक्रमक शतकाचा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर आहे. त्याने ३२ चेंडूंमध्ये शतक ठोकले
होते. अझरुद्दीनची १३७ धावांची खेळी टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजातर्फे तिसरी सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे. त्याने केएल राहुलचा विक्रम मोडला. राहुलने आयपीएल २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध १३२ धावांची खेळी केली होती. या यादीत श्रेयस अय्यर अव्वल स्थानी आहे.
मोठ्या भावाने ठेवले नाव
अझहरुद्दीनचा जन्म २२ मार्च १९९४ रोजी केरळच्या थालांगारामध्ये झाला. त्याचे हे नवा त्याच्या मोठ्या भावाने ठेवले. त्याचा मोठा भाऊ माजी कर्णधार अझरुद्दीनचा फॅन होता. त्यामुळेच त्याने आपल्या लहान भावाचे नाव मोहम्मद अझरुद्दीन ठेवले. त्याचे आई-वडील त्याचे नाव वेगळे ठेवण्याच्या विचारात होते. मोठ्या भावाला आशा होती की, त्याचा भाऊ कर्णधार अझहरप्रमाणे आक्रमक फलंदाजी करेल. योगायोग असा की, मोठ्या भावाची आशा २६ वर्षांनंतर सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये लहान भावाने सार्थ ठरविली.