पंजाब किंग्सचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याला रविवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पंजाब किंग्सनं सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. पंजाब किंग्सचा आज IPL 2021त दिल्ली कॅपिटल्सशी मुकाबला होणार आहे आणि त्या सामन्याआधी संघाला बसलेला हा मोठा धक्का आहे. लोकेश यंदाच्या आयपीएलमध्ये ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्यान ७ सामन्यांत ३३१ धावा केल्या आहेत आणि त्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ९१ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. लोकेशच्या अनुपस्थितीत आजच्या सामन्यात ख्रिस गेल संघाचे नेतृत्व सांभाळू शकतो.
''काल रात्री लोकेश राहुलच्या ओटीपोटात दुखू लागलं आणि प्राथमिक उपचारानंतरही त्याला बरं न वाटू लागल्यानं पुढील चाचणी साठी आप्तकालीन रुममध्ये नेण्यात आले. तेथे त्याला अपेंडिसिटिसचा त्रास असल्याचे समोर आले आहे. शस्त्रक्रीया करून तो बरा होऊ शकतो. त्याच्या सुरक्षिततेसाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे,'' असे पंजाब किंग्सनं पोस्ट केलं आहे.
दिल्लीला धक्का देण्यास पंजाब सज्ज, पण...रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला धक्का दिल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला पंजाब किंग्स संघ आता तुफान फॉर्ममध्ये असलेल्या 
दिल्ली कॅपिटल्सला धडक देण्यास सज्ज झाला आहे. दोन्ही संघांची फलंदाजी आणि गोलंदाजी मजबूत असल्याने चाहत्यांना तुल्यबळ लढतीचा आनंद मिळेल. मात्र, यंदाच्या सत्रातील दिल्लीचा सुरू असलेला धडाका पाहून पंजाबला विजयासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागेल. पंजाबसाठी गेल्या सामन्यात हरप्रीत ब्रार विजयाचा शिल्पकार ठरला होता. त्याने कर्णधार विराट कोहलीसह ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डीव्हिलियर्स यांना बाद करून पंजाबचा विजय साकारला होता.