IPL 2021, Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Live Updates : कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) माफक लक्ष्याचा पाठलाग करतानाही सामना अखेरच्या षटकापर्यंत ताणला. सनरायझर्स हैदराबादला ( SRH) आणखी एका पराभवाचा धक्का पचवावा लागला. डेव्हिड वॉर्नर प्रेक्षकांमध्ये बसून SRHला चिअर करताना दिसला. त्यामुळे त्याचे चाहते काहीसे निराश झाले. कोलकातानं विजय मिळवून चौथ्या स्थानावरील पकड आणखी मजबूत करून मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स यांचे टेंशन वाढवले.
हैदराबादला साजेशी सुरुवात करता आली नाही. पदार्पणात धुरळा उडवणारा जेसन रॉय सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. चांगल्या टचमध्ये असलेल्या वृद्धीमान सहाला आज भोपळाही फोडता आला नाही. टीम साऊदीनं त्याची विकेट घेतली. जेसन रॉय ( १०) शिवम मावीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. कर्णधार केन विलियम्सननं काही सुरेख फटके मारताना हैदराबादला तारण्याचा प्रयत्न केला, परंतु अती घाई त्याला नडली. शकिबच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो ( २६) धावबाद झाला. अभिषेक शर्मा आज तरी काही करेल असे वाटत होते, परंतु शाकिब अल हसनच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. हैदराबादला ८ बाद ११५ धावा करता आल्या. शिवम मावी व टीम साऊदी यांनीही प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताच्या आघाडीच्या खेळाडूंना साजेशी सुरुवात करता आली नाही. वेंकटेश अय्यर ( ८) व राहुल त्रिपाठी ( ७) यांना अनुक्रमे जेसन होल्डर व राशिद खान यांनी बाद केलं. आजच्या सामन्यात हैदराबादनं संधी दिलेल्या जम्मू-काश्मीरच्या उम्रान मलिकनं पदार्पणाच्या सामन्यातच विक्रम केला. त्यानं १५१ kmphच्या वेगानं चेंडू टाकून आयपीएल २०२१त भारतीय गोलंदाजानं टाकलेल्या सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम नावावर केला. याआधी हा विक्रम मोहम्मद सिराजच्या नावावर होता आणि त्यानं १४७.६८ kmph वेगानं चेंडू टाकला होता. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान टाकण्याचा विक्रम अॅनरिच नॉर्ट्जेच्या नावावर आहे. त्यानं याच पर्वात १५६.२२ kmphच्या वेगानं चेंडू फेकला. त्यानं डेल स्टेनचा १५४.४० kmph चा विक्रम मोडला. उम्रान मलिक जम्मू-काश्मीरसाठी १ लिस्ट ए व १ ट्वेंटी-२० सामना खेळला आहे.
कोलकाताचे फलंदाज प्रचंड सावध पवित्र्यात गेले होते. शुबमन गिलनं अर्धशतक झळकावून फॉर्म परत मिळवला, परंतु त्याच्या धावांचा वेग संथ होता. नितीश राणासह त्यानं ९ षटकांत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. या संथ खेळी मुळे कोलकातानं विकेट तर वाचवल्या, परंतु चेंडू व धावा यांच्यातील अंतर ते कमी करू शकले नाही. अखेरच्या चार षटकांत त्यांना विजयासाठी २४ धावा हव्या होत्या. १७व्या षटकात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात गिल ( ५७) झेलबाद झाला. KKR नं तिसरा फलंदाज गमावला. मॅच फिनिशर दिनेश कार्तिकला KKRनं आज बढती दिली आणि त्यानं पहिल्याच चेंडूवर स्ट्रेट ड्राईव्ह मारून चौकार कमावला. त्यानं आयपीएलमध्ये ४००० धावांचा पल्लाही ओलांडला. Dinesh Karthik has now scored 4000 runs in the IPL
१८व्या षटकात सेट फलंदाज नितीशही २५ धावांवर माघारी परतला. आता KKRची नवी जोडी खेळपट्टीवर होती आणि त्यांना १२ चेंडूंत १० धावा बनवायच्या होत्या. कोलकातानं ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला. त्यांच्या खात्यात १३ सामन्यांनंतर १२ गुण झाले आहेत. कार्तिकनं ( १८*) विजयी चौकार खेचून KKR चा विजय पक्का केला.