मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची (आरसीबी) सोमवारी आयपीएलच्या दुसऱ्या सत्रातील सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. अवघ्या ९२ धावांत संपूर्ण संघ बाद झाल्यानंतर पुढील १० षटकांत त्यांना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (केकेआर) ९ गड्यांनी भलामोठा पराभव पत्करावा लागला. आयपीएलच्या इतिहासात आरसीबी सहाव्यांदा शंभरी गाठण्यापूर्वीच बाद झाले असून आकडेवारीवर नजर टाकल्यास ते कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध अनेकदा अपयशी ठरल्याचे दिसून येईल.
आरसीबीला आयपीएलमधील दक्षिण आफ्रिका म्हटले जाते. कारण महत्त्वाच्या क्षणी दक्षिण आफ्रिका संघाने हमखास कच खाल्लेली असून आरसीबीची कामगिरीही त्यांच्याप्रमाणेच झालेली दिसून आली आहे. त्यामुळेच आरसीबीला आयपीएलमधील ‘चोकर्स’ म्हणूनही ओळखले जाते.
कर्णधार विराट कोहली, धडाकेबाज एबी डिव्हीलियर्स, विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल यांच्या जोडीला युझवेंद्र चहलची लेगस्पिन गोलंदाजी आणि काएल जेमिन्सन, हर्षद पटेल अशी वेगवान गोलंदाजांची फळी संघात असतानाही आरसीबीला आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करण्यात यश आलेले नाही.
कोलकाताविरुद्धच्या निराशानजन कामगिरीनंतर पुन्हा एकदा आरसीबीच्या कामगिरीचे विश्लेषण झाले. आयपीएलमध्ये आतापर्यंत आरसीबी संघ सहावेळा शंभरीच्या आत बाद झाला असून एकदा तर या संघाला ५० धावाही पूर्ण करता आल्या नव्हत्या. विशेष म्हणजे कोलकातानेच आरसीबीचा २०१७ मध्ये अवघ्या ४९ धावांमध्ये खुर्दा पाडला होता. इतकेच नाही, तर एकूण सहापैकी तीन वेळा आरसीबी कोलकाताविरुद्धच शंभरीच्या आत बाद झाला आहे. त्यामुळेच, आरसीबी आयपीएलमध्ये कोलकाताचे गिऱ्हाईक ठरत असल्याची चर्चा सध्या रंगत आहे.
आरसीबीचा निच्चांक!
१. ४९ धावा वि. केकेआर कोलकाता २०१७
२. ७० धावा वि. सीएसके चेन्नई २०१९
३. ७० धावा वि. राजस्थान अबुधाबी २०१४
४. ८२ धावा वि. केकेआर बंगळुरु २००८
५. ८७ धावा वि. सीएसके पोर्ट एलिझाबेथ २००९
६. ९२ धावा वि. केकेआर अबुधाबी २०२१