Join us

IPL 2021 : अश्विनला गोलंदाजी न देणे ही चूक होती - रिकी पॉंटिंग

Ricky Ponting : पहिल्या सामन्यातून बाहेर बसलेला वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याच्या घोट्याला हलकी दुखापत असल्याची माहिती रिकी पॉंटिंग यांनी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 06:26 IST

Open in App

चेन्नई : राजस्थान रॉयल्सविरुद्ध गुरुवारच्या सामन्यात तीन गड्यांनी झालेल्या पराभवानंतर ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याला गोलंदाजीचा कोटा पूर्ण करू न देणे ही मोठी चूक होती, अशी कबुली दिल्ली कॅपिटल्सचे कोच रिकी पॉंटिंग यांनी दिली आहे.अश्विनने तीन षटकात केवळ १४ धावा दिल्या. यादरम्यान त्याच्या चेंडूवर कुणी चौकारदेखील मारू शकले नव्हते. दिल्लीला १४८ धावांचा बचाव करायचा होता. खेळपट्टीवर दोन डावखुरे फलंदाज डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया असताना नवा कर्णधार ऋषभ पंत याने मार्क्‌स स्टोयनिसकडे चेंडू सोपविला होता. स्टोयनिसच्या या षटकांत तीन चौकारांसह १५ धावा गेल्यामुळे रॉयल्सच्या ५ बाद ५२ वरून ५ बाद ७३ धावा झाल्या. यावर पॉंटिंग म्हणाले, ‘संघासोबत बसून चर्चा करण्याची वेळ येईल तेव्हा यावर तोडगा काढू. पहिला सामना अश्विनसाठी निराशादायी होता, मात्र तो काही दिवसांपासून कठोर मेहनत घेत आहे. आमच्याकडून चूक झाली. यावर तोडगा काढण्यात येईल.’ ख्रिस मॉरिसने १८ चेंडूत नाबाद ३६ धावा ठोकून दोन चेंडू आधीच राजस्थानला विजय  मिळवून दिला.

 ईशांतच्या घोट्याला दुखापत

पहिल्या सामन्यातून बाहेर बसलेला वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याच्या घोट्याला हलकी दुखापत असल्याची माहिती रिकी पॉंटिंग यांनी दिली. ईशांतच्या जागी आवेश खान हा दोन्ही सामने खेळला. मागच्या सत्रात एकमेव सामना खेळलेल्या ईशांतच्या घोट्याचे स्नायू ताणले गेले होते. यानंतर तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतही खेळला नव्हता. 

टॅग्स :आयपीएल २०२१