Join us  

IPL 2021: लोकांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलविणे आमची जबाबदारी; अष्टपैलू ख्रिस मॉरिसचे मत

अष्टपैलू ख्रिस मॉरिसचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 12:27 AM

Open in App

मुंबई : भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाबाबत आमच्या संघात वारंवार चर्चा होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांनी जीव गमावला. बाधितांची संख्या लाखोंच्या घरात आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण सापडत असताना औषधांचा तसेच ऑक्सिजनचा तुटवडा पाहायला मिळतो. संकटकाळात लोकांच्या चेहऱ्यांवर हास्य निर्माण करण्याची जबाबदारी आमचीच असल्याचे मत राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस याने व्यक्त केले आहे.

शनिवारी केकेआरवर विजय नोंदविल्यानंतर मॉरिस म्हणाला, ‘आमच्या बैठकीत कोरोना संकटावर सतत चर्चा होते. आम्ही बायोबबलमध्ये सुरक्षित असल्यामुळे क्रिकेट खेळत आहोत. खेळाच्या माध्यमातून लोकांना आनंदी करणे आमचे काम आहे. आयपीएल सामने अनेक घरांत टीव्हीवर पाहिले जातात. आमच्या खेळामुळे लोक आनंदित होणार असतील, तर चांगला खेळ करणे आमचेही कर्तव्य आहे.’  ‘आम्ही जिंकलो किंवा हरलो काय; पण लोकांना आनंदी पाहण्याची ही संधी आहे.

लोक आनंदी होणार असतील तर क्रिकेटपटू म्हणून आम्ही चांगले काम करीत आहोत,’ असे मॉरिस म्हणाला. मॉरिसने केकेआरविरुद्ध २३ धावांत चार गडी बाद केले. त्यानंतर संजू सॅमसन आणि डेव्हिड मिलर यांनी संयमी खेळी करीत सहा गड्यांनी सामना जिंकून दिला. ‘आम्ही योजनाबद्धरीत्या काम केले. अचूक टप्प्यावर मारा केला. यॉर्कर आणि मंद चेंडू टाकण्यावर भर दिला.’ या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास परतल्याची माहिती मॉरिसने दिली.

कोरोनात आयपीएल कसे? ॲडम गिलख्रिस्टचा सवाल

सिडनी : भारतात कोरोनाचा उद्रेक होत असताना आयपीएलचे आयोजन योग्य आहे? का, असा सवाल ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक ॲडम गिलख्रिस्ट याने उपस्थित केला. दररोज हजारो लोकांचा जीव जात असताना, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना भारतात आयपीएलचे आयोजन योग्य आहे? कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली.

दिवसभरात साडेतीन लाखावर नवे रुग्ण सापडत आहेत, अशी चिंता गिलख्रिस्टने ट्‌वीट करीत व्यक्त केली. तो म्हणाला, ‘आयपीएल योग्य आहे? मी सर्वांसाठी प्रार्थना करतो.’ भारतात कोरोनाची भयानक स्थिती असताना आयपीएल जोमात सुरू आहे. प्रत्येक सायंकाळी कोरोनावरून लक्ष विचलित करण्याचा हा चांगला पर्याय शोधलेला दिसतो, असा खोचक प्रश्नही उपस्थित केला. तुमचे विचार काहीही असोत, मी तुमच्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो,’ असे गिलख्रिस्टने लिहिले.

टॅग्स :आयपीएल २०२१भारत