- सुनील गावसकर
ऋषभ पंत याने मागच्या दोन सामन्यांतील चुकांपासून धडा घेतला असेल, तर यंदा दिल्ली कॅपिटल्स आयपीएलमध्ये प्रतिष्ठेचे विजेतेपद पटकावू शकतो. अर्थात, ज्याचा संघ जितका चांगला तितका संघाचा कर्णधारदेखील चांगला असतो. दिल्ली संघ फार चांगला आहे, यात शंका नाही. संघाकडे उच्च दर्जाची फलंदाजी फळी आहे. गोलंदाजीतही उत्कृष्ट वेगवान गोलंदाजांचे त्रिकूट आहे. ऋषभने वेगवेगळ्या गोष्टींना प्राधान्य दिल्यामुळे मागील दोन्ही सामन्यांत दिल्लीला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते.
आरसीबीविरुद्ध अपेक्षेप्रमाणे युवा प्रतिभावान गोलंदाज आवेश खान याला अखेरच्या षटकात चेंडू सोपविला; पण तो दडपणाचा सामना करू शकला नाही. चेन्नईविरुद्ध क्वालिफायरमध्ये अक्षर पटेल याला फलंदाजीत बढती दिली. डावखुऱ्या अक्षरने आधीच्या सामन्यात एकदाही धावांचा झंझावात केला नव्हता. याचा अर्थ असा की, दिल्लीला महत्त्वपूर्ण चेंडूंवर धावा काढण्यात अपयश आले. अशा चेंडूंवर फॉर्ममध्ये असलेला शिमरोन हेटमायर १५-२० धावा काढू शकला असता. लक्ष्याचा बचाव करण्याची वेळ आली तेव्हा ऋषभने टॉम कुरेनला प्राधान्य दिले. अखेरच्या षटकात कॅगिसो रबाडा हादेखील उपयुक्त करतो, हे कर्णधार विसरला होता. कर्णधार म्हणून ऋषभचे हे पहिले सत्र आहे. अशावेळी त्याच्या निर्णयाविरुद्ध काही घडल्यास त्याच्यावर टीका होणे स्वाभाविक आहे. त्याचा मेंटॉर महेंद्रसिंग धोनी याने याच सामन्यात शार्दूल ठाकूर याला आधी फलंदाजीला पाठवून अक्षर पटेलसारखेच पाऊल उचलले होते. ठाकूरनेदेखील अभावानेच फलंदाजी केली होती. त्यानंतर मात्र धोनीने लीडरशिपचा अर्थ काय, हे दाखवून दिले. तो मैदानावर आला आणि डोळ्यांच्या पापण्या लवण्याआधीच त्याने संघाला अंतिम फेरीत नेऊन ठेवले. पंतबाबत चांगली बाब अशी की, तो प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक असतो. मग दोन सामन्यांत जे काही घडले त्यातून बोध घेणार का? केकेआरविरुद्धच्या लढतीतकडे नव्या चष्म्यातून बघणार? परिस्थिती ओळखून खेळणार आहे काय?
हा सामना मोठी सीमारेषा असलेल्या दुबई स्टेडियममध्ये रंगला असता, तर केकेआर दावेदार असता. कार त्यांच्याकडे गूढ गोलंदाज आहेत. शारजाचे मैदान पात्र दिल्लीच्या पॉवर हीटर्ससाठी समान संधी देणारे ठरेल. आरसीबीचे फलंदाज सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्तींविरुद्ध अपयशी ठरले असतील, ते सर्व उजव्या हाताने फलंदाजी करणारे होते. दिल्ली संघात मात्र डावे- उजवे फलंदाज आहेत. ते केकेआरच्या गोलंदाजांना लाइन आणि लेंग्थचा विचार करायला भाग पाडतील.