Join us  

IPL Final, CSK vs KKR Live Updates : चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी धु धु धुतले, दिनेश कार्तिकच्या एका चुकीनं KKRच्या पायावर पडला धोंडा

IPL 2021 Final, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Updates : ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस या जोडीनं चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) डोलारा सक्षमपणे आपल्या खांद्यावर उचलला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 9:17 PM

Open in App

IPL 2021 Final, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Updates : ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस या जोडीनं चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) डोलारा सक्षमपणे आपल्या खांद्यावर उचलला. कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) यानं दाखवलेला विश्वास रॉबीन उथप्पानं पुन्हा एकदा योग्य ठरवला. त्यानं कमी वेळात धडाकेबाज खेळी करून CSKची गाडी सुसाट पळवली. फॅफ एक बाजून लावून होताच आणि मोईन अलीनंही फटकेबाजी करताना संघाला मोठा पल्ला गाठून दिला. ज्या फिरकीपटूंच्या जोरावर KKR उडत होते, आज त्यांना CSKच्या फलंदाजांनी जमिनीवर आणले. फॅफ ड्यू प्लेलिसला तिसऱ्या षटकात दिलेलं जीवदान कोलकाताला प्रचंड महागात पडले.

फिरकीपटूंच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर कोलकातानं अंतिम फेरीत प्रवेश केला आणि चेन्नईविरुद्ध त्यांनी त्याच जोरावर वर्चस्व गाजवण्याचा डाव आखला. त्यांना यश मिळालेली असते, परंतु दिनेश कार्तिकनं तिसऱ्या षटकात फॅफ ड्यू प्लेलिससला यष्टिचीत करण्याची संधी गमावली. ऋतुराज गायकवाड दुसऱ्या बाजूनं कोलकाताच्या गोलंदाजांना न जुमानता फटकेबाजी करत होता. आयपीएल इतिहासात orange cap जिंकणारा तो सर्वात युवा फलंदाज ठरला. त्यानं लोकेश राहुलच्या ६२६ धावांपेक्षा अधिक धावा या पर्वात केल्या आहेत. ( Ruturaj Gaikwad becomes the youngest to win the orange cap in IPL history). फॅफ व ऋतुराज या जोडीनं आणखी एकदा CSKसाठी अर्धशतकी भागीदारी केली.

९व्या षटकात KKRनं सुनील नरीनला पाचारण केलं आणि त्यानं CSKला मोठा धक्का दिला. ऋतुराज त्याच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात शिवम मावीच्या हाती झेल देऊन माघारी परतला. ऋतुराजनं २७ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३२ धावा केल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये ऋतुराज व फॅफ ड्यू प्लेसिस जोडीनं ७५२* धावांची भागीदारी केली. त्यांनी शिखर धवन व पृथ्वी शॉ ( २०२१) यांचा ७४४ धावांचा विक्रम मोडला. आयपीएलमध्ये सर्वाधिक ७९१ धावा करणाऱ्या सलामीवीरांचा विक्रम जॉनी बेअरस्टो व डेव्हिड वॉर्नर यांनी २०१९च्या पर्वात केला होता. फॅफ व रॉबीन उथप्पा यांनी फलंदाजीचा गिअर बदलला आणि फटकेबाजी केली. फॅफनं खणखणीत षटकार खेचून ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं.  चेन्नईनं १२ षटकांतच शंभर धावा पूर्ण केल्या होत्या. फॅफ व उथप्पा तुफान फटकेबाजी करताना दिसले आणि उथप्पानं डीप पॉईंटच्या दिशेनं षटकार खेचून २६ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. याही जोडीला नरीनची दृष्ट लागली. १४व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचल्यानंतर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात उथप्पा पायचीत झाला. उथप्पानं १५ चेंडूंत ३ खणखणीत षटकारांसह ३१ धावा कुटल्या. नरीननं ४ षटकांत २६ धावा देत २ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. १५ षटकांत चेन्नईच्या २ बाद १३१ धावा झाल्या होत्या. शिवम मावीनं टाकलेल्या १७व्या षटकाची सुरुवात व शेवट हा मोईन अलीनं षटकारानं केला. अली व फॅफ यांनीही  अर्धशतकी भागीदारी पूर्ण करताना CSKसाठी धावांचा डोलारा उभा केला. चेन्नईनं २० षटकांत ३ बाद १९२ धावा केल्या. अली २० चेंडूंत ३७ धावांवर नाबाद राहिला. फॅफं ५९ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ८६ धावा केल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२१एफ ड्यु प्लेसीसऋतुराज गायकवाडचेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App