मुंबई : बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्जला नमवून यंदाच्या आयपीएलमध्ये दिमाखात सुरुवात केलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला पहिल्या विजयानंतरच मोठा धक्का बसला. प्रमुख वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्खिया कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला संघाबाहेर जावे लागले आहे. त्यामुळे आता दुसºया सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या होत्या. परंतु, म्हणतात ना संकट फारकाळ टिकत नाही, फक्त त्याला खंबीरपणे तोंड द्यावे लागते, तसेच आता दिल्लीकरांच्या बाबतीत झाले आहे. कारण, एकीकडे नॉर्खिया क्वारंटाईन झालेला असताना, त्याच्या जागी त्याच तोडीचा एक जबरदस्त वेगवान गोलंदाज संघात दाखल झाला आहे. हा गोलंदाज म्हणजे कागिसो रबाडा.
गेल्या सत्रात दिल्लीसाठी चमकदार कामगिरी केलेला नॉर्खिया पहिल्या सामन्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे त्याला आता सर्वांपासून दूर व्हावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार क्वारंटाईन होण्यापूर्वी झालेल्या चाचणीत नॉर्खिया कोरोना पॉझिटिव्ह आढळला. मात्र, आता त्याची जागा घ्यायला दक्षिण आफ्रिकेचा अव्वल गोलंदाज सज्ज झाला आहे.
रबाडाने नुकताच दिल्लीच्या नेट्समध्ये घाम गाळला. दिल्ली कॅपिटल्स संघाने सोशल मीडियावरुनही रबाडाच्या एन्ट्रीची माहिती दिली. बुधवारी रबाडाने क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर संघाच्या सराव सत्रात सहभाग घेतला. त्यामुळे आज राजस्थानविरुद्ध होणाºया सामन्यात तो खेळेल, हे जवळपास निश्चित आहे. दिल्ली संघानेही तसे संकेत दिले आहेत.
रबाडा सहा एप्रिलला मुंबईत दाखल झाला. त्याने पाकिस्तानविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळल्यानंतर भारतासाठी उड्डाण केले होते. गेल्या सत्रात कमालीचे सातत्य राखताना रबाडाने पर्पल कॅपवर कब्जा केला होता. त्याने ८.३४ च्या इकोनॉमी रेटने ३० बळी घेतले होते. दिल्लीला अंतिम फेरीत नेण्यात रबाडाचा सिंहाचा वाटा राहिला होता. त्यामुळेच नॉर्खिया जरी आता संघाबाहेर असला, तरी रबाडाच्या येण्याने दिल्ली संघात आत्मविश्वास उंचावलेला आहे.