Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live : विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या जोडीनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाला दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या षटकापासून आक्रमक खेळ केला, विराटला फॉर्मात परतलेलं पाहून त्याचे पाठीराखेही भलतेच खूश झाले होते. देवदत्त व विराट यांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करताना पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १११ धावा जोडून विक्रमाची नोंद केली. CSKविरुद्ध RCBच्या खेळाडूंनी केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. पण, विराटच्या विश्वविक्रमाची प्रतीक्षा लांबली. अवघ्या १३ धावांमुळे त्याला हुकलावणी द्यावी लागली.
विराट व देवदत्तनं RCBला अपेक्षित सुरुवात करून दिली. विराटनं २०१९नंतर प्रथमच आयपीएलमधील पहिल्या षटकात दौन चौकार खेचले. यापूर्वी २०१९मध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्या षटकातील पाचव्या व सहाव्या चेंडूवर त्यानं चौकार खेचले होते. आज त्यानं दीपक चहरच्या पहिल्या दोन चेंडूवर हा पराक्रम केला. विराट व देवदत्त यांनी पॉवरप्लेमध्येच अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. विराटनं पॉवरप्लेमध्ये २१ चेंडूंत ३३ धावा चोपल्या आणि पॉवरप्लेमधील ही त्याची दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. २०१३मध्ये त्यानं CSK विरुद्धच २१ चेंडूंत ३९* धावा केल्या होत्या.
त्यात विराटनं CSKचा गोलंदाज शार्दूल ठाकूर याच्या गोलंदाजीवर मारलेला खणखणीत षटकार म्हणजे सोने पे सुहागा... शार्दूलनं टाकलेला चेंडू उत्तुंग टोलवल्यानंतर विराटनं त्याकडे पाहलेही नाही, त्याला आत्मविश्वास होता की तो चेंडू सीमारेषेपार जाईल. विराटनं मारलेला हा षटकार स्टेडियमबाहेर गेला. या दोघांनी चेन्नईविरुद्ध RCBकडून कोणत्याही विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी केली. यापूर्वी २०१२मध्ये ख्रिस गेल व विराट यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०९ धावा जोडल्या होत्या. विराट-देवदत्तची १११ धावांची भागादीर ड्वेन ब्राव्होनं मोडली. विराट ४१ चेंडूंत ६ चौकार व १ षटकार खेचून ५३ धावांवर रवींद्र जडेजाच्या हाती झेल देऊन माघारी परतला.
बंगलोरनं १५ षटकांत १ बाद ११८ धावा केल्या होत्या. विराटला या सामन्यात मोठा विश्वविक्रम करण्याची संधी होती. त्यानं ६६वी धाव घेताच हा विक्रम होणार होता, परंतु तो ५३ धावांवर बाद झाला.या सामन्यात विराटनं ६६ धावा करताच ट्वेंटी-२०त त्याच्या १० हजार धावा पूर्ण होणार होत्या आणि असा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला असता.
ट्वेंटी-२० त सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
ख्रिस गेल - १४,२६१
किरॉन पोलार्ड - ११,१९५
शोएब मलिक - १०,८०८
डेव्हिड वॉर्नर - १०,०१७
विराट कोहली - ९९३४*
![]()