नवी दिल्ली: मद्यपान करणे आणि मद्यप्रसारास प्रोत्साहन देणे इस्लामविरोधी मानले जाते. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली मुस्लीम आहे. तो आगामी आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळणार असून या संघाच्या जर्सीवर मद्याची जाहिरात करण्यात आल्यामुळे मोईनने जर्सी घालण्यास नकार दिला. सीएसके संघानेदेखील त्याची मागणी मान्य करीत लोगो पुसून टाकण्याचा निर्णय घेतला. मोईन हा इंग्लंडमधील क्लबसाठी खेळताना देखील या गोष्टीची खबरदारी बाळगतो.
सीएसके संघात द. आफ्रिकेचे इम्रान ताहिर आणि के. एम. आसिफ यांचादेखील समावेश आहे. ताहिरने यापूर्वीदेखील मद्याची जाहिरात असलेली जर्सी घालण्यास नकार दिला होता. त्याची विनंतीही मान्य करण्यात आली होती. २०१९चा विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाने शॅम्पेन फोडून विजयोत्सव साजरा केला, त्यावेळीदेखील मोईन आणि सहकारी आदिल राशिद यांनी यापासून स्वत:ला दूर ठेवले होते. मागच्या सत्रात आरसीबीसाठी खेळतानादेखील मोईनने मद्य कंपनीचा लोगो असलेली जर्सी घालण्यास नकार दिला होता.