नवी दिल्ली : आयपीएलच्या २०२१ च्या सत्रात ‘सॉफ्ट सिग्नल’चा नियम राहणार नाही. नो बॉल आणि शॉर्ट रनचा निर्णयदेखील तिसरा पंच बदलू शकेल. यंदा आयपीएलला ९ एप्रिल रोजी सुरुवात होत आहे. त्याआधी बीसीसीआयने काही नियमांत बदल केले. भारताचा कर्णधार विराट कोहली याने असे निर्णय सामना फिरवू शकतात, अशी शंका व्यक्त करीत सॉफ्ट सिग्नलचा नियम काढून टाकण्याची मागणी केली होती.
यानुसार बीसीसीआयने सुधारलेल्या नियमानुसार एखादा पंच कुठल्याही निर्णयाबाबत तिसऱ्या पंचाची मदत घेण्याआधी सॉफ्ट सिग्नलची मदत घेऊ शकणार नाही. याआधी मैदानी पंच तिसऱ्या पंचाची मदत घेण्याआधी सॉफ्ट सिग्नलद्वारे निर्णय घेत होते.
याशिवाय तिसरे पंच नो बॉल आणि शॉर्ट रनचादेखील निर्णय बदलू शकेल. ९० मिनिटात २० षटके टाकणे अनिवार्य राहिल. इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी-२० सामन्यादरम्यान सूर्यकुमारचा झेल मलानने टिपला. त्यावेळी रिप्लेत चेंडू जमिनीला आधी लागल्याचे स्पष्ट दिसत होते. तथापि, अनेकदा रिप्ले पाहिल्यानंतरही तिसऱ्या पंचांनी मैदानी पंचांचा सॉफ्ट सिग्नलचा निर्णय कायम ठेवला होता. यावर माजी दिग्गजांनी टीका करीत नियम बदलण्याची आयसीसीकडे मागणी केली होती.
सॉफ्ट सिग्नल म्हणजे काय?
मैदानी पंच क्लोज कॅचबाबत सल्ला घेण्यासाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतो तेव्हा त्याला स्वत:चा निर्णयदेखील द्यावा लागतो. मैदानी पंच स्वत:चा निर्णय सांगतो, शिवाय तो निर्णय चूक नाही, हे पडताळण्यास तिसऱ्या पंचाची मदत घेतो. आयसीसी नियमानुसार हा निर्णय बदलला जाऊ शकतो.