नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या पर्वाचा लिलाव येत्या १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यंदा होणाऱ्या लिलावात एकूण १०९७ खेळाडूंवर बोली लागणार असून, यासाठी अनेक दिग्गज खेळाडू रांगेत असल्याची माहिती आहे.आयपीएलने ट्विटर हॅन्डलवर ही माहिती दिली. यंदाचे पर्व भारतात आयोजित करण्याचा सर्वंकष प्रयत्न असल्याने बीसीसीआयने अलीकडे स्पष्ट केले होते. कोरोनामुळे आयपीएलचे १३वे पर्व यूएईत आयोजित झाले होते.
बांगलादेशचा निलंबनाच्या कारवाईला सामोरे जाणारा शाकिब-अल-हसन, भारताचा श्रीसंत यांचाही लिलाव होणाऱ्या खेळाडूंमध्ये समावेश आहे. दिग्गज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने लिलावामध्ये नाव नोंदवले असून त्याने बेस प्राईस २० लाख रुपये ठेवली आहे.
यंदा आयपीएल लिलावात ॲरोन फिंच, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस मॉरिस अशी नावे चर्चेत आहेत. स्टीव्ह स्मिथ याच्यावर सर्वाधिक नजर असेल. स्मिथला लिलावाआधी राजस्थान रॉयल्सने रिलिज केले. त्याच्या जागी संजू सॅमसन याला संघाचा कर्णधार निवडले. ॲरोन फिंच यालादेखील आरसीबीने यंदा रिलिज केले होते. २०२० च्या पर्वात किंग्स इलेव्हन पंजाबसाठी खराब कामगिरी करणारा ग्लेन मॅक्सवेल हादेखील आयपीएल लिलावात आकर्षण राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मॅक्सवेल आयपीएलमध्ये एकही षटकार मारू शकला नव्हता, मात्र भारताविरुद्ध मालिकेत त्याने टी-२० आणि वन डे मालिकेत धावा काढल्या होत्या. यंदा जानेवारीत सर्व फ्रॅन्चायजींनी आपली रिटेन आणि रिलिज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयला सोपवली. आरसीबीने सर्वाधिक दहा खेळाडूंना रिलिज केले. पंजाबने ९ खेळाडूंची हकालपट्टी केली, तर मागच्या मोसमात प्ले ऑफ न गाठू शकलेल्या सीएसकेने केवळ सहा खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखविला, पण अनुभवी खेळाडूंवर विश्वास कायम राखला आहे.
सनराइजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सने सर्वाधिक खेळाडूंना रिटेन केले आहे. मुंबईने २०२०च्या फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करीत विक्रमी पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरले होते.
कोणत्या देशाचे किती खेळाडू
यादीत वेस्ट इंडिजचे २७, ऑस्ट्रेलियाचे ४२ आणि द. आफ्रिकेचे ३८ खेळाडू आहेत. भारताकडून आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या २१ खेळाडूंसह एकूण २०७ जणांचा समावेश आहे. सहयोगी देशांच्या २७ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. याशिवाय ज्यांनी आपल्या देशाच्या सिनियर संघाचेदेखील प्रतिनिधित्व केले नाही असे ८६३ खेळाडू आहेत. त्यात ७४३ भारतीय आणि ६८ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. देशाचे प्रतिनिधित्व न करता आयपीएल सामना खेळलेल्या किमान ५० भारतीय खेळाडूंचा लिलावात सहभाग असेल.
n प्रत्येक फ्रन्चायजी संघात किमान २५ जणांना स्थान देणार असेल तर लिलावात ६३ खेळाडूंची खरेदी होईल. त्यात २२ विदेशी खेळाडू असू शकतील. लिलाव दुपारी ३ वाजेपासून सुरू होईल. किंग्स इलेव्हन पंजाबकडे सर्वाधिक ५३.२० कोटी असून, आरसीबी (३५.९० कोटी), राजस्थान रॉयल्स (३४.८५ कोटी रुपये), चेन्नई सुपरकिंग्स (२२.९० कोटी रुपये), मुंबई इंडियन्स (१५.३५ कोटी), दिल्ली कॅपिटल्स (१२.९ कोटी रुपये) आणि कोलकाता नाइटरायडर्स तसेच सनराइजर्स हैदराबाद (१०.७४ कोटी प्रत्येकी) अशी रक्कम शिल्लक आहे.