नवी दिल्ली : बीसीसीआयने आयपीएलच्या ३१ सामन्यांचे आयोजन करण्याची तयारी जवळपास सुरू केली आहे. त्यासाठी बोर्डाचे काही पदाधिकारी यूएईत तळ ठोकून आहेत. इंग्लिश खेळाडू आयपीएलचा दुसरा टप्पा खेळणार नसल्याचे स्पष्ट होताच विदेशी खेळाडूंना यूएईत खेळण्याची सक्ती करण्याचा बोर्डाचा विचार दिसतो. त्यासाठी खेळाडूंच्या फ्रँचायजीमार्फत दबाव वाढविला जात आहे.
बोर्डाच्या सूत्रांनी बुधवारी गौप्यस्फोट केला. यूएईत न खेळणाऱ्या विदेशी खेळाडूंची वेतनकपात होणार आहे. फ्रँचायजी खेळाडूंना त्यांनी खेळलेल्या सामन्याइतकेच वेतन देतील. सामन्यांचे आयोजन १८-१९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत होईल. वृत्तानुसार पॅट कमिन्ससारख्याने ३१ सामने खेळले नाहीत तर त्याचा संघ त्याला उर्वरित रक्कम देणार नाही. कमिन्सला कोलकाता नाईट रायडर्सने १५.५ कोटींत खरेदी केले होते. तो यूएईत खेळणार नसेल तर केकेआर त्याला केवळ ७.७ कोटी रुपये देईल.
असे दिले जाते वेतन
लिलावात खेळाडूवर लागलेली बोली हे त्याचे वेतन असते. ते एका मोसमासाठी दिले जाते.
बीसीसीआय विदेशी खेळाडूच्या वेतनातील काही टक्के रक्कम त्याच्या बोर्डाला देते. ज्या देशाचे जितके खेळाडू त्या प्रमाणात बोर्डाला टक्केवारी मिळते.
आयपीएलमध्ये खेळाडूला वेतन हे १२ महिन्यांत तीन किंवा चार टप्प्यांत मिळते. खेळाडू स्पर्धेदरम्यान जखमी झाल्यास त्याला पूर्ण रक्कम मिळते. आयोजकांकडून स्पर्धा पूर्ण होणार नसेल तरी संपूर्ण वेतन दिले जाते.
खेळाडू वैयक्तिक कारणास्तव पूर्ण स्पर्धा खेळणार नसेल तर फ्रँचायजी त्याला सामन्याआधारे वेतन देते. हाच नियम वापर यूएईत न खेळणाऱ्या विदेशी खेळाडूंना लागू असेल.
भारतीय खेळाडूंना नियम लागू नाही
भारताच्या मध्यवर्ती करार मिळालेल्या खेळाडूंना आयपीएलच्या वेतनकपातीची चिंता बाळगण्याचे कारण नाही. २०११च्या आयपीएलदरम्यान बीसीसीआयचे तत्कालीन सचिव एन. श्रीनिवासन यांनी खेळाडू विमा योजना लागू केली होती. यानुसार भारतीय खेळाडू वैयक्तिक कारणास्तव आयपीएल खेळू शकले नाहीत तरी त्यांना पूर्ण रक्कम देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
कोणत्या देशाचे किती खेळाडू?
आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाचे १७, इंग्लंड १४, द. आफ्रिका ९, वेस्ट इंडीज ९, न्यूझीलंड ८, अफगाणिस्तान ३ आणि बांगलादेशचे दोन खेळाडू आहेत. पॅट कमिन्ससह बांगलादेशचे शाकिब अल हसन आणि मुस्तफिजूर रहमान हेदेखील खेळण्याची शक्यता नाही.