Join us  

IPL 2020:...जेव्हा बलाढ्यांचे बुरुज ढासळले! अपयशामुळे एका युगाचा अंत झाला

IPL 2020, CSK, MS Dhoni News: 1975 ते 1995 पर्यंत म्हणजे साधारण दोन दशकं वेस्ट इंडीजचे क्रिकेट जगतावर असेच वर्चस्व होते. पहिल्या दोन्ही विश्वचषक स्पर्धा जिंकल्यावर तिसऱ्या स्पर्धेत कपिल देवच्या (Kapil Dev)  सळसळत्या उर्जावान संघाकडून ते नामोहरम झाले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 10:51 AM

Open in App

ललित झांबरे

यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई सुपर किंग्जने घोर निराशा केली. आतापर्यंत कधीही चौथ्या स्थानाच्या खाली न गेलेला हा संघ प्रथमच आयपीएलची प्ले ऑफ (Play Off) फेरी गाठू शकला नाही. सलग 12 वर्षे सातत्य टिकवून ठेवलेल्या धोनीच्या (MS Dhoni)  संघाच्या या अपयशामुळे एका युगाचा अंत झाला असे म्हणता येईल. खेळांच्या दुनियेत अशी वेळ प्रत्येकावर येत असते. कुणीही सदासर्वकाळ आघाडीवर राहू शकत नाही. क्रिकेटमध्येच वेस्ट इंडीज व ऑस्ट्रेलियाचे संपलेले वर्चस्व हे याचे उत्तम उदाहरण आहे. 

वेस्ट इंडिज क्रिकेट संघ (West Indies cricket) 

1975 ते 1995 पर्यंत म्हणजे साधारण दोन दशकं वेस्ट इंडीजचे क्रिकेट जगतावर असेच वर्चस्व होते. पहिल्या दोन्ही विश्वचषक स्पर्धा जिंकल्यावर तिसऱ्या स्पर्धेत कपिल देवच्या (Kapil Dev)  सळसळत्या उर्जावान संघाकडून ते नामोहरम झाले होते. मात्र कसोटी सामन्यांमध्ये त्यांचा दबदबा कायम होता. 1980 च्या दशकात अपवाद वगळता त्यांनी कसोटी मालिका गमावली नाही. क्लाईव्ह लॉईड (Clive Lloyd), विव्ह रिचर्डस (Viv Richards) , रिची रिचर्डसन...त्यांचा प्रत्येक कर्णधार यशाचे नवनवे मापदंड रचत राहिला. मात्र 1996 च्या विश्वचषक स्पर्धेपासून ते असे काही घसरले की हा तोच वेस्ट इंडिजचा संघ आहे का, यावर विश्वास ठेवणे अवघड गेले. कसोटी सामन्यांमध्ये ते आता आठव्या आणि वन डे व टी-20 क्रमवारीत नवव्या स्थानी आहेत. हे त्यांचे स्थानच फार बोलके आहे. 

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ ऑलन बोर्डर (Allan Border) , स्टिव्ह वॉ, शेन वार्न, ग्लेन मैकग्रा यांच्या काळात जगज्जेता होता. तीन विश्वविजेतेपद याची साक्ष होते. 1999 ते 2007 दरम्यान ते वन डे क्रिकेटचे बेताज बादशहा होते. कसोटी क्रिकेटमध्ये तर हा दबदबा रिकी पोंटींगने पुढेसुध्दा कायम ठेवला पण आता त्यांचा तो अपराजेय दबदबा गेला आहे. ते सातत्य गेले आहे. 

मँचेस्टर युनायटेड (Manchester United)

फूटबॉलमध्ये मँचेस्टर युनायटेड क्लबचे असेच उदाहरण आहे. प्रीमीयर लीग 1992 मध्ये सुरू झाली तेंव्हापासून 2013 पर्यंत ते प्रीमियर लीगचे अनभिषीक्त सम्राट होते. या काळात 13 वेळा त्यांनी ट्रॉफी उंचावली. दोन वेळा चॅम्पियन्स लीग जिंकले. 21 वर्षे त्यांच्या वर्चस्वाला आव्हान देणारे कुणीच नव्हते. त्यांचे प्रशिक्षक सर अँलेक्स फर्ग्युसन हे 26 वर्षानंतर 2013 मध्ये निवृत्त झाले आणि मँचेस्टर युनायटेडचे दिवस फिरले. आदल्या वर्षी ज्या खेळाडूंसह त्यांनी प्रीमियर लीग जिंकली जवळपास त्याच खेळाडूंसह 2012-13 मध्ये ते सातव्या स्थानी आले. त्यानंतर मँचेस्टर युनायटेडला पुन्हा ती उंची गाठता आली नाही. 

एसी मिलान (AC Milan)

2007 पर्यंत पाचव्यांदा युरोपियन कप जिंकणाऱ्या एसी मिलानची स्थिती अशीच आहे.सलग 25 वर्षे ते यशोशिखरावर होते. पावलो माल्दिनी ट्रॉफीज गोळा करत होता. इटालियन लिग सेरी एची सात विजेतेपदं आणि युरोपची पाच विजेतेपदं त्यांच्या नावावर लागली होती.मात्र 2000 च्या दशकात हे दिवस पालटले. 2020-11 पासून ते सेरी ए जिंकू शकलेले नाहीत. आता माल्दिनी पुन्हा त्यांचे टेक्निकल डायरेक्टर म्हणून परतले आहेतआणि यंदा पुन्हा ते त्यांच्या जुन्या फॉर्मात दिसत आहेत. 

शिकागो बुल्स (Chicago Bulls)

एनबीएमध्ये शिकागो बुल्सचा संघ आठ वर्षात सहा वेळा विजेता ठरला होता. प्रशिक्षक फिल जॅकसन यांच्या मार्गदर्शनात मायकेल जॉर्डन, स्कोटी पिप्पेन व डेनिस रोडमन हे प्रतिस्पर्ध्यांच्या छातीत धडकी भरवत होते. 1998 मध्ये हे चित्र बदलले. मायकेल जॉर्डन गेला, जॅकसनही गेले, पिप्पेनही सोडून गेला आणि त्यांच्यासोबत शिकागो बुल्सचे यशही गेले.नंतर 2011 चा अपवाद वगळता त्यांनी यश पाहिलेले नाही. 2011 मध्ये ते ईस्टर्न कॉन्फरन्सच्या फायनलमध्ये पोहोचले होते. गेल्या मोसमात ते 15 पैकी 11 व्या आणि त्याच्या आदल्या दोन मोसमात 13 व्या स्थानी होते. 

अर्सेनल (Arsenal)

मँचेस्टर युनायटेड व एसी मिलानसारखीच अर्सेनल क्लबची गाडी घसरलेली आहे. आर्सेन वेंगर यांनी त्यांना यशाचे दिवस दाखवले होते. 2003-04 पर्यंत सात वर्षात ते तीन वेळा विजेते ठरले होते. 2003-04 मध्ये तर एकही सामना न गमावता विजेतेपदाचा पराक्रम त्यांनी केला होता. पण नंतर चित्र एकदम बदलले. वेंगर असले तरी त्यांची जादू चालेनाशी झाली. पॅट्रिक व्हिएरा व थिएरी हेन्री हे सोडून गेले. त्यांचा बचाव हा विनोदाचा विषय बनला. 

लॉस एंजेल्स लेकर्स (LA Lakers) 

कोबे ब्रायंट व शाकिल ओनीलचा हा संघ 10 वर्षात पाच वेळा एनबीए विजेता ठरला. मात्र जॅकसन गेल्यानंतर आणि कोबेच्या निवृत्तीनंतर 10 वर्षात ते केवळ दोनदा प्लेऑफपर्यंत पोहोचले आहेत. त्यानंतर आता पुन्हा ते एनबीए चॅम्पियन बनले आहेत. लेब्रॉन जेम्स व अँथोनी डेव्हिसमुळे ते पुन्हा विजयपथावर परतले आहेत. 

फेरारी (Ferrari)

फॉर्म्युला वन मोटार रेसिंगमध्ये 2000 ते 2004 दरम्यान फेरारीचे राज्य होते. मायकेल शुमाकर व रॉस ब्रॉन त्यांच्याकडे होते. ड्रायव्हर्स आणि कन्स्ट्क्टर्स अशा दोन्ही चॅम्पियनशीप त्यांच्याकडे होत्या. त्यांना आव्हान देणारे कुणीच नाही अशी स्थिती होती. 2005 मध्ये शुमाकर व 2006 मध्ये ब्रॉन गेल्यावरसुध्दा दोन वर्ष त्यांचे यश कायम होते परंतु त्यानंतर दशकभरात ते यशाला पारखे झाले आहेत.यंदा तर ते सहाव्या स्थानी आहेत आणि पहिल्या स्थानावरील मर्सिडीजची त्यांच्यावर 342 गुणांची आघाडी आहे. 

टॅग्स :IPL 2020वेस्ट इंडिजआॅस्ट्रेलिया