Join us

IPL 2020 : ज्याची तुलना क्रिकेटच्या देवाशी झाली, त्याला झालंय तरी काय? सोशल मीडियावर होतोय ट्रोल  

Prithvi Shaw News : गुरुवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या क्वालिफायर लढतीतही पृथ्वी शून्यावर बाद झाला. काही सामन्यांचा अपवाद वगळता यंदाच्या मोसमात पृथ्वी अपयशी ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 13:41 IST

Open in App

मुंबई : २०१३ सालचा नोव्हेंबर महिना कोणताही क्रिकेटप्रेमी विसरु शकणार नाही. कारण याच महिन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेत २२ यार्डाच्या खेळपट्टीला अखेरचा नमस्कार केला होता. मात्र त्याच्या बरोबर चार दिवसांनी मुंबई क्रिकेटमध्ये एक युवा तारा समोर आला आणि त्याची तुलना थेट क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरशी झाली. हा तारा होता पृथ्वी शॉ (Prithvi Shaw). त्याने शालेय क्रिकेटमध्ये तब्बल ५४६ धावांची विक्रमी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र सध्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये खराब फॉर्ममध्ये असलेला हाच पृथ्वी टीकाकारांच्या टार्गेटवर आहे.सचिनच्या निवृत्तीनंतर चारच दिवसांनी पृथ्वीने शालेय क्रिकेटमध्ये विक्रमी खेळी केल्याने त्याची तुलना सचिनसोबत होऊ लागली. पृथ्वीने काही अंशी सचिनप्रमाणेच कामगिरी करताना रणजी आणि दुलीप ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण करत शतक झळकावले आणि सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली. याशिवाय २०१८ साली कसोटी पदार्पण करताना त्याने शतक झळकावत सचिनच्याही पुढचे पाऊल टाकले. त्यामुळे त्याच्याकडे भविष्यातील मोठा स्टार फलंदाज म्हणून पाहिले गेल.मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये हाच स्टार फलंदाज फ्लॉप होताना दिसत असल्याने सोशल मीडियावर सध्या पृथ्वी ट्रोल होताना दिसत आहे. गुरुवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या क्वालिफायर लढतीतही पृथ्वी शून्यावर बाद झाला. काही सामन्यांचा अपवाद वगळता यंदाच्या मोसमात पृथ्वी अपयशी ठरला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये पृथ्वीने १३ सामने खेळताना १३६.५२च्या स्ट्राईक रेटने २२८ धावाच केल्या. गेल्या ८ डावांमध्ये त्याची सर्वोच्च खेळी केवळ १९ धावांची आहे. यादरम्यान तो तब्बल तीनवेळा शून्यावर बाद झाला हे विशेष. शॉच्या सातत्याने अपयशी कामगिरीमुळे दिल्लीच्या मधल्या फळीवर कमालीचे दडपण आले. याचा मोठ परिणाम दिल्लीच्या कामगिरीवरही झाला.त्यामुळेच, ज्याची तुलना एकेकाळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी झाली होती, त्याला नेमके झाले तरी काय? असा प्रश्न क्रिकेटचाहते विचारत आहेत. शिवाय सोशल मीडियावरही पृथ्वीवर अनेक मीम्स व्हायरल होत असून तो जबरदस्त ट्रोल होत आहे.

टॅग्स :पृथ्वी शॉसचिन तेंडुलकरIPL 2020