मुंबई : सनरायझर्स हैदराबादने शनिवारी रात्री रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला ५ गड्यांनी नमवून यंदाच्या आयपीलमध्ये प्ले ऑफ गाठण्याच्या दिशेने भक्कम वाटचाल केली. त्याचवेळी आरसीबीला आता प्ले ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी आपला अखेरचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. त्यामुळेच कर्णधार विराट कोहलीनेही संघाच्या पुढील वाटचालीसाठी, ‘आता सर्व चित्र स्पष्ट आहे,’ असे म्हणत आपले इरादे स्पष्ट केले.
आरसीबीला ७ बाद १२० धावांवर रोखल्यानंतर हैदराबादने १४.१ षटकांतच ५ फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य पार केले. युझवेंद्र चहलचा अपवाद वगळता आरसीबीच्या इतर गोलंदाजांना फारशी छाप पाडता आली नाही. कमी धावसंख्येचे दडपण सुरुवातीपासूनच त्यांच्यावर दिसू लागले होते. चहलने १९ चेंडूंत २ बळी घेतले. हैदराबादने रिद्धिमान साहा (३९) आणि मनीष पांडे यांनी सावध परंतु खंबीर खेळी केली.
सामन्यानंतर कोहली म्हणाला की, ‘आता आम्हाला अखेरचा साखळी सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. आता परिस्थिती स्पष्ट आहे. अखेरचा सामना जिंका आणि अव्वल दोन संघामध्ये स्थान मिळवा. हा शानदार सामना होईल, कारण दोन्ही संघांचे (दिल्ली कॅपिटल्स) प्रत्येकी १४ गुण आहेत.
संघाच्या कामगिरीबाबत कोहली म्हणाला की, ‘संघाने उभारलेली धावसंख्या पुरेशी नव्हती. आम्ही १४० च्या आसपास धावांचा विचार केला होता. मात्र परिस्थिती खूप बदलली, ज्याचा आम्ही विचारही केला नव्हता. आम्हाला वाटले होते की, दवाचा परिणाम होणार नाही आणि हवामान चांगले राहील. माझ्यामते आम्ही फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली नाही. प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी खेळपट्टीचा चांगला वापर करत मारा केला.’