अबूधाबी : खडतर आव्हानांना सामोरे जात प्ले-ऑफमध्ये स्थान निश्चित करणारा सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. हैदराबाद संघ विजयी लय कायम राखत जेतेपदाकडे आगेकूच करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.
स्पर्धेत संथ सुरुवातीनंतर दुसऱ्या टप्प्यात चमकदार कामगिरी करीत सनरायझर्सने गुणतालिकेत आरसीबीपेक्षा वरचे तिसरे स्थान पटकावत प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले.
स्पर्धेच्या साखळी फेरीतील अखेरच्या टप्प्यात उभय संघांची कामगिरी परस्पर विरोधी राहिली. आरसीबी सलग चार सामने गमावत गुणतालिकेत चौथ्या स्थानी राहिला तर सनरायझर्सने विजयाची हॅटट्रिक साजरी केली.
सनरायझर्सने अखेरच्या तीन सामन्यात दिल्ली कॅपिटल्स, आरसीबी आणि अव्वल स्थानावरील मुंबई इंडियन्सचा पराभव केला. करा अथवा मरा अशी स्थिती असलेल्या अखेरच्या लढतीत त्यांनी मुंबईचा १० गडी राखून पराभव केला. त्याचे श्रेय डेव्हिड वॉर्नर व रिद्धिमान साहा या सलामी जोडीला जाते. दोघांनी दिल्लीविरुद्ध १०७ आणि मुंबईविरुद्ध १५१ धावांची भागीदारी केली. वॉर्नरने आतापर्यत १४ सामन्यांत ५२९ धावा केल्या आहेत तर साहाने ३ सामन्यांत १८४ धावा फटकावत सुरुवातीच्या लढतीत त्याला न खेळविणे ही संघ व्यवस्थापनाची चूक असल्याचे सिद्ध केले आहे. वॉर्नर व साहा यांच्या कामगिरीमुळे मनीष पांडे, केन विलियम्सन, प्रियम गर्ग आणि जेसन होल्डर यांच्यासारख्या खेळाडूंना विशेष काही करावे लागले नाही.