लेग स्पिनर राशीद खान चर्चेत आहे. बळी घेण्याची व धावा रोखण्याची हमी देणारा तो गोलंदाज आहे. त्याचे २४ चेंडू म्हणजे कर्णधार डेव्हिड वॉर्नरसाठी सामना जिंकून देणारे अस्त्र आहे. तर त्याच्या चेंडूवर फलंदाज बाद झाला नाही तर प्रतिस्पर्धी संघ सुटकेचा श्वास सोडतो. त्याने आपल्या गोलंदाजीने प्रत्येकला फॅन केले आहे. भारतीय क्रिकेटचे दिग्गज व प्रसिद्ध समालोचक सुनील गावसकर त्याच्या गोलंदाजीचे चाहते झाले आहेत. त्यांच्या मते, प्रत्येक कर्णधार राशीदला आपल्या संघात स्थान देण्यास इच्छुक असेल.
लढतीनंतर नियमित बातचीत करताना गावसकर यांनी राशीदची प्रशंसा करताना म्हटले की, ‘जर तुम्ही कुठल्याही कर्णधाराला विचारले की संघात कुठला गोलंदाज हवा तर प्रत्येक कर्णधार राशीदचे नाव घेईल. तो बळी घेतो, डॉट बॉल टाकतो. त्याची गुगली समजणे प्रत्येक फलंदाजासाठी आव्हान असते. त्याचे चेंडूवर शानदार नियंत्रण असते. अशा स्थितीत प्रत्येक कर्णधार मला तो गोलंदाज द्या, अशी मागणी करेल.’
गुरुवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध राशीदने शानदार गोलंदाजी केली. धोकादायक ठरू पाहणाऱ्या निकोलस पुरनलाही त्याने तंबूचा मार्ग दाखवला. राशीदने पंजाबविरुद्ध ४ षटकांत १२ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. सध्याच्या आयपीएलमध्ये तीन सामन्यांत ८ बळी घेतले आहेत. त्याने केवळ ४.८३ प्रति षटक सरासरीने धावा दिल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही शानदार आहे. प्रत्येक १८ व्या चेंडूवर त्याने बळी घेतला आहे. त्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने १४ धावांत ३ बळी घेतले होते.