दुबईत सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगची रंगत वाढत चालली आहे. सध्या मुंबई, दिल्ली, बंगळुरूचे संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. तर बाकीचे संघ मात्र अडखळताना दिसत आहेत. हैदराबादचा संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर संघाचं नेतृत्त्व करत आहेत. वॉर्नरला यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्या लौकिकाला साजेशी फटकेबाजी करता आलेली नाही.
हैदराबादचा संघ आतापर्यंत आयपीएलमध्ये ८ सामने खेळला आहे. या ८ सामन्यांत डेव्हिड वॉर्नरनं २८४ धावा फटकावल्या आहेत. वॉर्नरची सरासरी ३५.५०, तर स्ट्राईक रेट १२१.८८ इतका आहे. वॉर्नरनं यंदाच्या आयपीएलमध्ये दोन अर्धशतकं झळकावली आहेत. मात्र त्याला धडाकेबाज फलंदाजी करता आलेली नाही. त्यामुळे वॉर्नरवरील दबाव वाढला आहे. मात्र या परिस्थितीतही वॉर्नर क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे.
वॉर्नर मैदानात अनेकदा लक्ष वेधून घेत असतो. मैदानावरील, संघातील वातावरण हलकंफुलकं राहील याची काळजी वॉर्नर घेतो. असाच एक व्हिडीओ वॉर्नरनं त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केला आहे. यामध्ये वॉर्नर आणि जॉनी बॅरियेस्टो मॅच प्रेझेंटरसोबत दिसत आहेत. लाईव्ह मुलाखत सुरू असताना वॉर्नर पादला. त्यातही गंमतीचा भाग म्हणजे तो आवाज माईकमध्ये अगदी व्यवस्थित रेकॉर्ड होईल याचीही वॉर्नरनं काळजी घेतली. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरून शेअर करत वॉर्नरनं योग्य शीर्षक देण्याचं आवाहन केलं आहे.
गुणतालिकेत हैदराबाद कोणत्या स्थानावर?हैदराबादचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये ८ पैकी केवळ ३ सामने जिंकला आहे. सध्या गुणतालिकेत ते पाचव्या स्थानी आहेत. त्यामुळे बाद फेरीत प्रवेश करायचा असल्यास हैदराबादला सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. अन्यथा २०१६ मध्ये विजेत्या ठरलेल्या हैदराबादचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येईल.