शारजाह : सलग तीन पराभवांमुळे चिंतेत असलेल्या राजस्थान रॉयल्सपुढे शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्सला रोखण्याचे आव्हान आहे. रॉयल्सची सुरुवात चांगली झाली होती. त्यांनी शारजाहमध्ये दोन्ही सामने जिंकले होते, पण अबुधाबी व दुबई येथील मोठ्या मैदानांवर मात्र त्याला पराभव स्वीकारावा लागला. आता परत शारजाहमध्ये खेळायचे आहे आणि येथे मिळविलेले दोन विजय त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी महत्त्वाचे ठरतील.
दुसऱ्या बाजूचा विचार करता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाने खेळाच्या तिन्ही विभागात वर्चस्व गाजवले आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सने अंतिम ११ खेळाडूंत यशस्वी जयस्वाल आणि वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीसह अंकित राजपूतला संधी दिली होती, पण त्यांना विजय मिळविता आला नाही. दिल्लीतर्फे गोलंदाजीमध्ये कागिसो रबाडाने आतापर्यंत १२ बळी घेतले आहेत. वेगवान गोलंदाज एनरिच नोर्जेची कामगिरीही उल्लेखनीय ठरली आहे.
वेदर रिपोर्ट- दिवसाचे तापमान ३६ डिग्री सेल्सियस राहण्याची शक्यता. ह्युमिडिटी ५३ टक्के तर हवेचा वेग २१ किलोमीटीर प्रतितास राहण्याची शक्यता.
पीच रिपोर्ट- धावांचा पाऊस पडण्याची शक्यता. जास्तीत जास्त डावांमध्ये २०० पेक्षा अधिक धावा फटकावल्या गेल्या. हैदराबाद संघाला १७४ धावाच करता आल्या.
मजबूत बाजू
राजस्थान। जोस बटलरला सूर गवसला आहे. शारजाहमध्ये दोन्ही सामन्यांत विजय मिळविला असल्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावण्यास उपयुक्त ठरू शकतो. राहुल तेवतियामुळे फलंदाजी मजबूत.
दिल्ली। पाचपैकी चार विजय मिळविल्यामुळे मनोधैर्य उंचावलेले. कर्णधार श्रेयस अय्यर शानदार फॉर्मात. पृथ्वी शॉ, पंत, स्टोईनिस यांचीही कामगिरी उल्लेखनीय.
कमजोर बाजू
राजस्थान। सर्वोत्तम ११ खेळाडूंचा शोध घेण्यात अपयश. सलग तीन पराभवांमुळे मनोधैर्य ढासळले. गोलंदाजीमध्ये आर्चर व कुरेन यांच्यावर दडपण.
दिल्ली। शिखर धवन, शिमरोन हेटमेयर यांना कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश. रविचंद्रन अश्विनच्या कामगिरीत सातत्य नाही.