मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (Royal Challengers Banglore) शनिवारी धमाकेदार विजय मिळवताना राजस्थान रॉयल्सचा (Rajsthan Royals) पराभव केला. यासह आरसीबीने गुणतालिकेत आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. मात्र आरसीबीचा सलामीवीर अॅरोन फिंच (Arron Finch) अद्याप आपल्या लौकिकानुसार खेळताना दिसला नाही आणि त्यामुळेच आरसीबीला थोडी चिंता आहे. त्यात आता ड्रेसिंग रुममध्ये तो ई-सिगारेट ओढताना दिसल्याने सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे.
ड्रेसिंग रुममध्ये ई-सिगारेट ओढत असतानाचा फिंचचा व्हिडिओ सामन्यादरम्यान समोर आल्याने आता त्याच्यावर कोणती कारवाई होणार, याबाबत सोशल मीडियावर प्रश्न विचारले जात आहेत. त्याचवेळी, सोशल मीडियावर सिगारेट औढण्याबाबत आयपीएलच्या नियमावलीवर प्रश्नही उपस्थित होत आहेत.
राजस्थान रॉयल्सविरुद्ध धावांचा पाठलाग करताना कॅमेरामनने काही क्षणांसाठी कॅमेरा आरसीबीच्या ड्रेसिंग रुमकडे वळवला. यावेळी, फिंच सिगारेट ओढत असल्याचे दिसून आले. यानंतर काही वेळानेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला आणि चर्चेला उधाण आले.