दक्षिण आफ्रिकेचा शानदार खेळाडू आणि रॉयल चँलेजर्स बंगलोरच्या मधल्या फळीतील तडाखेबंद फलंदाज असलेल्या ए.बी.डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये खेळताना आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला आहे. ए.बी.ने आतापर्यंत आयपीएलमध्ये खेळताना २२ सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला. आतापर्यंत तो त्याचा एकेकाळचा संघ सहकारी ख्रिस गेल सोबतच (२१) या यादीत संयुक्त पहिल्या स्थानावर होता.
कोलकाता नाईट रायडर्स विरोधातील लढतीत एबीडीचे तुफान मैदानावर घोंगावले. आणि त्याने आपल्याकारकिर्दीत २२ वा सामनावीराचा पुरस्कार पटकावला. त्याच्या पाठोपाठ रोहित शर्मा (१८), डेव्हिड वॉर्नर (१७), एम.एस. धोनी (१७) आणि शेन वॉटसन (१६) यांचा समावेश आहे. सोमवारी झालेल्या केकेआर विरोधातील सामन्यात ए.बी.ने ३३ चेंडूतच नाबाद ७३ धावा फटकावल्या. त्याच्या या कामगिरीनेच आरसीबीने १९४ धावा केल्या आणि
केकेआरवर ८२ धावांनी विजय साकारला. त्याने आतापर्यंत १६१ आयपीएल सामन्यात ४०.५५ च्या सरासरीने ४६२३ धावा केल्या आहेत. त्यात ३६ अर्धशतके आणि तीन शतकांचा समावेश आहे. त्याने आयपीएलमध्ये तब्बल २२५ उत्तुंग षटकार तर ३७७ चौकार लगावले.