भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावसकर यांना फार कमीवेळा रागावलेले बघितले आहे. पण सोमवारी आयपीएल लढतीदरम्यान असा प्रसंग घडला की त्यांचा राग अनुभवाला मिळाला. घटना होती, आरसीबी-दिल्ली आयपीएल लढतीदरम्यान बँगलोरचा युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याने प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज मार्कस स्टोईनिसवर बीमर टाकला. हे १५ व्या षटकात घडले.
त्यावेळी स्वत: गावसकर समालोचन करीत होते. ते म्हणाले, बघा, तुम्ही मला काहीही सांगू शकता, पण यॉर्कर एवढ्या उंचीवरून येत नाही. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर पुढे म्हणाले, ‘जर तुम्ही फुल यॉर्कर गोलंदाजी करीत असाल तर चेंडू गुडघ्यापर्यंत किंवा खूप झाले तर छातीपर्यंत येईल, पण त्यापेक्षा वर नाही. चेंडू हातातून सुटला असेही तुम्ही मला सांगू शकत नाही.’ मुद्दाम बीमर टाकल्यानंतर युवा गोलंदाजाने स्टोईनिसची क्षमाही मागितली नाही, याचेही गावसकर यांना वाईट वाटले.