दुबई : पाच महिन्यानंतर प्रथमच नेट््समध्ये सरावासाठी उतरला त्यावेळी घाबरलो होतो, पण आगामी इंडियन प्रीमिअर लीगच्या(आयपीएल) तयारीसाठी पहिले सराव सत्र अपेक्षापेक्षा चांगले ठरले, असे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या कर्णधाराला कोरोना व्हायरस महामारीमुळे पाच महिने सराव करता आला नाही. नेट सत्रामध्ये दक्षिण आफ्रिकेचा महान वेगवान गोलंदाज डेल स्टेन व संघाचे संचालक माईक हेसनही उपस्थित होते.
फ्रॅचायझी वेबसाईटच्या मते कोहली म्हणाला,‘प्रामाणिकपणे सांगयाचे झाल्यास हे सत्र अपेक्षेपेक्षा चांगले झाले. मी थोडा घाबरलेलो होतो. मी पाच महिन्यापासून बॅट पकडली नव्हती, पण मी अपेक्षा केली त्यापेक्षा हे सत्र चांगले झाले.’
गेल्या वर्षी आयपीएल संघासाठी सर्वाधिक धावा फटकावणारा ३१ वर्षीय कोहली म्हणाला की, लॉकडाऊनमध्ये फिटनेस राखल्यामुळे मला नेट सत्रात चांगली कामगिरी करण्यास मदत झाली. कोहलीने प्रदीर्घ कालावधीनंतर नेट््समध्ये सराव केला. कोहली म्हणाला,‘ लॉकडाऊनदरम्यान मी बरीच मेहनत घेतली. त्यामुळे मला फिट वाटत आहे आणि त्यामुळे मदत होते. कारण तुमचे शरीर हलके होते आणि प्रतिक्रियाही शानदार होते. मला असे वाटते की माझ्याकडे चेंडू खेळण्यासाठी अतिरिक्त वेळ आहे. ही चांगली बाब आहे.’
कोहली पुढे म्हणाला,‘जर तुम्हाला जड वाटले तर शरीराच्या हालचाली मंदावतात आणि डोक्यात वेगळे विचार घर करतात, पण तसे काही घडले नाही, सराव सत्र अपेक्षेच्या तुलनेत अधिक चांगले झाले.’
आरसीबी संघ गेल्या आठवड्यात दुबईत दाखला झाला आणि विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर शनिवारी खेळाडूंनी नेट््समध्ये सरावाला सुरुवात केली.
कोहली व्यतिरिक्त युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज नदीम हे फिरकीपटूंचे त्रिकूट व काही अन्य वेगवान गोलंदाजांनी सराव केला. पहिल्या सत्रानंतर कोहली खूश होता.
कोहली म्हणाला,‘ फिरकीपटू पहिल्या दिवशी चांगले भासत होते. त्यांनी प्रदीर्घ काळ एकाच ठिकाणी चेंडूचा टप्पा राखला. शाहबाज चांगला होता, सुंदरनेही चांगला मारा केला. मी चहललाही गोलंदाजी करताना बघितले. वेगवान गोलंदाजांच्या वेगामध्ये थोडा कमी-अधिकपणा जाणवला, पण शिबिराची सुरुवात चांगली झाली.’(वृत्तसंस्था)
सकारात्मक विचार करणे अधिक महत्त्वाचे : शिखर धवन
दिल्ली कॅपिटल्स संघाच्या सदस्यांनीही शनिवारी सायंकाळी येथे आयसीसी अकादमीमध्ये आपल्या पहिल्या नेट सत्रात सहभाग नोंदवला.
डावखुरा फलंदाज शिखर धवन म्हणाला,‘आम्ही प्रदीर्घ कालावधीनंतर एकत्र आलो. त्यामुळे अधिक ऊर्जा होती व ही चांगली सुरुवात होती.’
धवन म्हणाला पूर्वीप्रमाणे चपळता येण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागेल. तो म्हणाला,‘आम्ही गेल्या सहा दिवसांपासून येथे आहो. येथे उष्णता असल्यामुळे थोडी शिथिलता होती. चार दिवसांमध्ये शरीर येथील वातावरणासोबत समरस होईल आणि पुन्हा पूर्वीची चपळता येईल.’
मानसिक कणखरतेबाबत बोलताना धवन म्हणाला,‘सकारात्मक विचार करणे अधिक महत्त्वाचे आहे. आम्ही येथे प्रदीर्घ कालावधीनंतर आलो, याचा विचार करायला नको. आम्हाला एक पाऊल पुढचा विचार करायला हवा. आम्ही चांगला खेळ करीत आहोत, असा विचार करायला हवा. त्यामुळे आम्हाला मदत होईल. आम्ही स्पर्धेत चांगली कामगिरी करू असा विश्वास आहे.’