चेन्नई : भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाचा अपवाद वगळता चेन्नई सुपर किंग्सचे सर्व खेळाडू १५ ऑगस्टपासून चेन्नईत होणाऱ्या सहा दिवसीय कंडिशनिंग कॅम्पमध्ये सहभागी होणार आहेत. आयपीएलच्या १३ व्या सत्रात सहभागी होण्यासाठी यूएईला रवाना होण्यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्सच्या येथे १५ ते २० ऑगस्ट या कालावधीत सहा दिवसीय शिबिराचे आयोजन करण्याात आले आहे. शिबिरात कर्णधार एम.एस. धोनी, हरभजन सिंग, सुरेश रैना आणि अंबाती रायुडूसह फ्रेंचायजीचे अन्य सर्व सदस्य सहभागी होतील. शिबिरात प्रामुख्याने फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग व सहायक प्रशिक्षक मायकल हसी २२ ऑगस्टपर्यंत दुबईमध्ये संघासोबत जुळण्याची शक्यता आहे. सीएसकेला दक्षिण आफ्रिकेचे फाफ ड्युप्लेसिस व लुंगी एनगिडी यांच्यापैकी एक खेळाडू सप्टेंबरमध्ये संघासोबत जुळेल अशी आशा आहे. विश्वनाथन म्हणाले,‘ १ सप्टेंबरनंतर ते थेट यूएईत संघासोबत जुळतील.दक्षिण आफ्रिकेचा तिसरा खेळाडू इम्रान ताहिर त्रिनिदाद कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी झाल्यानंतर संघासोबत जुळेल. एरिंक सिमन्स आणि ग्रेग किंग ही जोडी २१ ऑगस्ट रोजी दुबईमध्ये संघासोबत जुळेल, असेही विश्वनाथन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
ईएसपीएन क्रिकइन्फोने सीएसकेचे मुख्य कार्यकारी काशी विश्वनाथनच्या हवाल्याने सांगितले की,‘जडेजा वैयक्तिक कारणांमुळे सराव सत्रात सहभागी होणार नाही.’ दरम्यान जडेजा २१ आॅगस्टला जाणाºया दुबईच्या विमानात बसण्यासाठी चेन्नईत दाखल होईल. विश्वनाथ म्हणाले, तामिळनाडू सरकारने सुपर किंग्सला एम.ए. चिदम्बरम स्टेडियममध्ये बंद द्वार शिबिराचे आयोजन करण्याची लिखित परवानगी दिली आहे. गोलंदाजी प्रशिक्षक एल. बालाजी शिबिरात उपस्थित कोचिंग स्टाफचा एकमेव सदस्य असेल.