दुबई : दिल्ली कॅपिटल्सकडून ५९ धावांनी झालेल्या पराभवासाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहली याने गचाळ क्षेत्ररक्षण दोषी असल्याचे म्हटले आहे. झेल सोडून सामने जिंकता येत नाहीत, अशी कबुली देत मधल्या षटकात चांगल्या माऱ्यानंतर दिल्लीच्या फलंदाजांना स्वैर फटकेबाजीची मोकळीक दिल्याचे विराटने सांगितले. आगामी सामन्यात बदलाच्या शक्यतेबाबत तो म्हणाला, ‘ख्रिस मॉरिस कालचा सामना खेळण्यासाठी सज्ज होता, तथापि स्थान मिळवू शकला नाही. पुढील लढतीसाठी चार दिवस आहेत. त्या सामन्यात तो खेळू शकेल.’
गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने विजयी कामगिरीची पुनरावृत्ती करणार असल्याचे सांगितले. तो म्हणाला, ‘आम्ही मोठ्या विजयाच्या इराद्याने उतरलो होतो. त्यात यश आले. दडपणमुक्त होऊन दमदार फटकेबाजीचे डावपेच आखले होते. या विजयाचे श्रेय फलंदाजांसह गोलंदाजांनादेखील जाते.’ सामनावीर अक्षर पटेल म्हणाला, ‘खेळपट्टी मंद असल्याने मी लाईन आणि लेंग्थमध्ये बदल करीत वेगवेगळ्या टप्प्यावर चेंडू टाकले. ‘पॉवर प्ले’मध्येदेखील यशस्वी ठरलो याचा आनंद वाटतो.’
दिल्लीने सुरेख सुरुवात केली, आम्ही नंतरच्या आठ षटकात त्यांच्यावर वचक ठेवला होता. अखेरच्या षटकात मात्र आम्ही माघारलो. खराब क्षेत्ररक्षणाचा मोठा फटका बसला.