अबुधाबी : पंजाबविरुद्ध सामन्यात १० गडी राखून विजय मिळवत दमदार पुनरागमन करणाऱ्या सीएसकेला बुधवारी केकेआरविरुद्ध हातातोंडाशी आलेला विजय मिळवता आलेला नाही. शेन वॉटसन आणि अंबाती रायुडू मैदानात असताना चेन्नई सहज जिंकेल असे वाटले होते. दोघे माघारी फिरताच सामन्याचे चित्र पालटले. कर्णधार महेंद्रसिंह धोनीदेखील फारशी चमक दाखवू शकला नाही. सामना संपल्यानंतर धोनीने या पराभवाचे खापर फलंदाजांच्या अपयशावर फोडले.
‘मधल्या षटकात आम्ही लागोपाठ दोन-तीन गडी गमावले. त्या क्षणी सांभाळून फलंदाजी केली असती तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. गोलंदाजीत आम्ही खूप धावा दिल्या. हे आव्हान आम्ही सहज पूर्ण करायला हवे होते. तथापि गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीवर फलंदाजांनी पाणी फेरले,’ या शब्दात धोनीने स्वत:ची नाराजी व्यक्त केली.
‘केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिक याने सहकाऱ्यांचे कौतुक करीत माझा विश्वास सार्थकी लावल्याचे सांगितले. आमच्या फलंदाजी क्रमात फारच लवचिकता असून मी स्वत: तिसºया ते सातव्या स्थानावर खेळू शकतो, असे तो म्हणाला. सामनावीर राहुल त्रिपाठी याने हा क्षण माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
मोक्याच्या क्षणी कोलकाताच्या गोलंदाजांनी विकेट घेतल्यामुळे चेन्नईचा संघ काहीसा बॅकफूटवर गेला. दिनेश कार्तिकने सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांचा सुरेख वापर करत फलंदाजांवर दबाव आणला. अखेरच्या षटकाचा अपवाद वगळता आम्ही चौकारही मारू शकलो नाही. कोणी लहान टप्प्याचा चेंडू टाकत असेल तर चौकार मारण्याचे वेगळे तंत्र शोधावे लागेल,’ असे मत धोनीने व्यक्त केले.