दुबई : ‘संजू सॅमसन आणि जोस बटलर यांसारख्या खेळाडूंच्या उपस्थितीत आज शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात एकही चूक निकाल बदलविण्यास कारणीभूत ठरू शकते. मला चार षटकात अर्थात २४ चेंडूत सर्वोत्कृष्ट कामगिरी करावीच लागेल,’ असे दिल्ली कपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू हर्षल पटेल याने म्हटले आहे.
शारजाह येथे झालेल्या मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात हर्षल खेळला होता. तो म्हणाला, ‘आपण मोठ्या धावसंख्येचा सामना खेळताना २४ चेंडू टाकताना चुका होणार नाहीत, याची काळजी घ्यावीच लागते. चुका होणार नाहीत हे ध्यानात ठेवावे लागते. सर्वांविरुद्ध धावा निघणार हे डोक्यात ठेवूनच आपल्याला मारा करावा लागतो. एकही चूक सामन्याचा निकाल फिरवू शकते, असे टी-२० चे सूत्र आहे.
हा वेगवान गोलंदाज पुढे म्हणाला, ‘फलंदाज काय करू शकतो, याचा वेध घेऊन मारा करावा लागतो. चांगल्या टप्प्याचा चेंडू टाकला तरी फलंदाज फटका मारेल हे स्वीकारून गोलंदाजी करावी लागते. माझे लक्ष नेहमी संघाचे डावपेच अमलात आणण्याकडे असते.’
मागच्यावर्षी हर्षल जखमांमुळे त्रस्त होता. यंदा मात्र उपयुक्त कामगिरी करताना पाचव्या गोलंदाजाची भूमिका वठवत आहे. ‘आयपीएलमधील प्रत्येक संघाकडे दर्जेदार खेळाडू आहेत. त्यामुळे कडवी स्पर्धा आहे. जोस बटलर, स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन यांच्यापुढे गोलंदाजी करताना कौशल्य पणाला लावणे अत्यावश्यक आहे.