Join us  

IPL 2020 : मुंबई इंडियन्सनं गाजवले निर्विवाद वर्चस्व!; त्यांच्या यशामागचं नेमकं समिकरण काय?

मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचे जेतेपद पटकावलं. दुबईत रंगलेल्या अंतिम सामन्यात MIनं ५ विकेट्स राखून दिल्ली कॅपिटल्सवर ( Delhi Capitals) सहज विजय मिळवला. मुंबईचे हे पाचवे जेतेपद आहे. यापूर्वी त्यांनी २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९मध्ये जेतेपद पटकावले होते.

By स्वदेश घाणेकर | Published: November 11, 2020 8:00 AM

Open in App

- स्वदेश घाणेकरकोरोना व्हायरसच्या संकटात इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2020) UAEत खेळवण्याचा धाडसी निर्णय BCCIनं घेतला. बीसीसीआयनं हे आव्हान नुसते पेललं नाही, तर ते यशस्वी करूनही दाखवलं. मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) जेतेपदाचा मान पटकावला. अंतिम सामन्यात एकतर्फी निकाल नोंदवताना रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) संघानं प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सवर ( Delhi Capitals) पाच विकेट्स राखून विजय मिळवला. MIनं पाचव्यांदा आयपीएल जेतेपदाचा चषक उंचावला. आतापर्यंत एकाही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाही आणि कर्णधार म्हणून रोहितनंही पाचवे जेतेपद उंचावून विक्रमी कामगिरी केली. 

गतविजेते म्हणून मुंबई इंडियन्सलाIPL 2020चा सलामीचा सामना खेळण्याचा मान मिळाला आणि त्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं त्यांना पराभवाची चव चाखवली. त्यात २०१४मध्ये यूएईत मुंबई इंडियन्सला पाचही सामन्यात विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे सुरुवातीला जेतेपदाच्या शर्यतीत MI आघाडीवर नव्हतेच. सर्वांचे लक्ष विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर आणि पहिल्या टप्प्यात दमदार खेळ करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सवरच होते. पण, ऐन मोक्याच्या क्षणी माती खाण्याची परंपरा RCBनं कायम राखली आणि एलिमिनेटरमध्येच त्यांना गाशा गुंडाळावा लागला. RCB, DC, SRH आदी संघाकडे अशी कोणती गोष्ट नाही, जी MIकडे आहे आणि त्याच्याच जोरावर ते यशस्वी ठरले.

मुंबई इंडियन्सकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे कर्णधार रोहित शर्माचा खेळाडूंवरील विश्वास... प्रत्येक संघानं निकालानुसार आपापल्या संघात अदलाबदल केले. पण, दुखापत किंवा विश्रांती हे कारण वगळल्यास मुंबईच्या संघात फार बदल पाहायला मिळाले नाही. जसप्रीत बुमराह हा हुकमी एक्का त्यांच्याकडे होताच, परंतु लसिथ मलिंगानं माघार घेतल्यानं त्याला तोलामोलाची साथ कोण देईल, हा प्रश्न MIला सतावत होता. ट्रेंट बोल्टनं ती उणीव भरून काढली. नॅथन कोल्टर नायल आणि जेम्स पॅटिन्सन यांनी ती उणीव भरून काढली. जसप्रीतनं १५ सामन्यांत २७ विकेट्स घेतल्या. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो दुसऱ्या स्थानवर राहिला. बोल्ट, कोल्टर-नायल व पॅटिन्सन यांनी अनुक्रमे २५ ( १५ सामने), ५ ( ७ सामने) व ११ ( १० सामने) विकेट्स घेतल्या. विकेट घेण्याबरोबरच या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाच्या धावांवरही वेसण घातलं.

रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, क्विंटन डी'कॉक, किरॉन पोलार्ड ही तगडी फौज मुंबईकडे होतीच. पोलार्ड आणि रोहित ही जोडी तर मुंबईच्या प्रत्येक आयपीएल विजेतेपदाची साक्षीदार आहे. पण, यांच्यावरच संघ पूर्णपणे अवलंबून राहिला नाही. सूर्यकुमार यादवनं याही आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखली. त्यानं सलग तीन आयपीएलमध्ये ५१२ ( २०१८), ४२४( २०१९) आणि ४८० ( २०२०) धावा करताना मुंबई इंडियन्सच्या मधली फळी भक्कम केली. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईचा पॉकेट डायनामो इशान किशन सर्वांवर भारी ठरला. मुंबईकडून त्यानं सर्वाधिक ५१६ धावा चोपल्या. त्यानं ५७.३३ च्या सरासरीनं ही फटकेबाजी केली. 

क्विंटन डी'कॉकनंही मागच्या आयपीएलमधील फॉर्म कायम राखताना ५०३ धावा चोपल्या. त्यानं धमाकेदार सुरुवात करून दिल्यानंतर उर्वरित फलंदाजांना जास्त विचार न करता फटकेबाजीच करायची होती आणि ती त्यांनी केली. रोहित शर्मानं ३३२ धावा केल्या. पण, त्यानं अन्य खेळाडूंवर विश्वास कायम ठेवत संघात फार अदलाबदल केली नाही. त्याचा हा विश्वास खेळाडूंनीही सार्थ ठरवला. किरॉन पोलार्ड ( २६८), हार्दिक पांड्या ( २८१) असे फिनिशर असताना मुंबईसाठी अखेरच्या ५ षटकांत ९० धावाही कमी पडणारच... कृणालनं गोलंदाजीत फार चमक दाखवली नसली तरी फलंदाजीत त्यानं १०९ धावांचं योगदान दिलं. राहुल चहर हा यानंही कामगिरीत सातत्य राखले व १५ विकेट्स घेतल्या. 

RCB विराट कोहली व एबी डिव्हिलियर्सवर, CSK फॅफ ड्यू प्लेसिस व शेन वॉटसनवर, KXIP ख्रिस गेल व लोकेश राहुलवर, RR बेन स्टोक्स, स्टीव्हन स्मिथ व जोफ्रा आर्चर यांच्यावर, KKR आंद्रे रसेल व सुनील नरीनवर, DC शिखर धवन, श्रेयस अय्यर व कागिसो रबाडा यांच्यावर अवलंबून राहिलेले पाहायला मिळाले. पण, मुंबईच्या बाबतीत असे काहीच नव्हते. एकूणच काय, तर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात कुणी एक स्टार नाही, तर प्रत्येक जण स्टार ठरले. सर्वांनी आळीपाळीनं त्यांच्यावरील जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आणि संघाला पाचवे जेतेपद पटकावून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यात संघभावना हा महत्त्वाचा फॅक्टर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंमध्ये आहे. अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवनं स्वतःची विकेट रोहित शर्मासाठी दान केली, हे त्याचेच प्रतिक आहे.  

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्सरोहित शर्माजसप्रित बुमराहकिरॉन पोलार्डहार्दिक पांड्याक्रुणाल पांड्याक्विन्टन डि कॉक