मुंबई : Indian Premier League (IPL 2020) च्या प्ले ऑफच्या दिशेने आणखी एक भक्कम पाऊल टाकण्याच्या निर्धाराने आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hydrabad) आव्हानाला सामोरे जाईल. याआधीचा सामन्यात राजस्थानने चेन्नई सुपरकिंग्जला सहज नमवून आगेकूच केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता तो जोस बटलर (Jos Buttler). विशेष म्हणजे या शानदार खेळीमुळे त्याचा आयडॉल असलेला महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) हाही प्रभावित झाला आणि त्याने सामन्यानंतर बटलरला एक गिफ्टही दिले. यामुळे नक्कीच बटलरचा आत्मविश्वास आणखी वाढला असणार.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या चेन्नईला राजस्थानने ५ बाद १२५ धावांवर रोखले. यानंतर धावांचा पाठलाग करताना राजस्थानचीही ३ बाद २८ धावा अशी अवस्था झाली होती. मात्र स्टीव्ह स्मिथ-जोस बटलर या अनुभवी जोडीने संयमी नाबाद ९८ धावांची भागीदारी करत राजस्थानच्या विजयावर शिक्का मारला. बटलरने ४८ चेंडूंत नाबाद ७० धावा केल्या.
अबुधाबी येथे झालेल्या या सामन्यानंतर धोनीने बटलरची भेट घेऊन त्याचे अभिनंदन केले. शिवाय यावेळी धोनीने त्याला स्वत:ची ७ क्रमांकाची सीएसके जर्सी भेटही दिली. ही अनोखी भेट मिळाल्यानंतर बटलरच्या चेहºयावरील आनंद सर्वकाही सांगणारा होता. धोनीला आदर्श मानूनच बटलरने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यामुळे खुद्द धोनीकडून मिळालेले हे गिफ्ट त्याला कायमच प्रोत्साहन देणारे ठरेल.
राजस्थान रॉयल्सने धोनीची जर्सी हातात घेतलेले असतानाचा बटलरचा फोटो ट्वीट केला आहे. यावर चाहत्यांनीही लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडताना बटलरला पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.