दुबई : मागच्या काही सामन्यात पराभवानंतर लहान-लहान चुका सुधारल्या. आता विजयी वाटेवर परतलो असून ही लय कायम राहील, असा विश्वास चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केला.
चेन्नईने रविवारी पंजाबवर १० गड्यांनी सहज विजयाची नोंद केली. एकतर्फी विजयानंतर धोनी म्हणाला, ‘आम्ही लहान चुका सुधारल्या. फलंदाजीत जी गरज होती, ती पूर्ण झाली आहे. आगामी सामन्यात आम्ही अशा विजयांची पुनरावृत्ती करणार आहोत.’
‘पंजाबला कमी धावसंख्येवर रोखणे महत्त्वपूर्ण ठरले. यामुळे प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणता येते. सर्वच संघांकडे आक्रमक फलंदाज असल्यामुळे गोलंदाजांना अडचण होऊ शकते. आमच्या गोलंदाजांनी चोख काम केल्याचे मत धोनीने व्यक्त केले.
पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल निराश झाला. सर्वाधिक ६३ धावा फटकावल्यानंतरही पराभवाचे तोंड पाहावे लागल्यानंतर तो म्हणाला, ‘पाचपैकी चौथा सामना गमावणे निराशादायी आहे. अनेक चुका नडल्या शिवाय डावपेच लागू करण्यात अपयश आले. यातून बोध घेत मुसंडी मारण्याचे आमच्यापुढे आव्हान आहे.’ सामनावीर वॉटसन याने माझी खेळी संघाला विजय मिळवून देण्यात उपयुक्त ठरल्याने मी आनंदी असल्याचे सांगितले.
शेन वॉटसनने नेटमध्ये जो आक्रमक सराव केला, त्या आक्रमकतेचा सामन्यात वापर करणे त्याच्यासाठी कठीण नव्हते. फक्त एक खेळी पुरेशी आहे. डुप्लेसिस तर गोलंदाजाला बुचकळ्यात टाकून फटके मारण्यात तरबेज आहे.’