नवी दिल्ली : खेळाडूंच्या सुरक्षेबाबत चिंतित भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) आवाहन केले की, व्यावसायिक पातळीवर खेळादरम्यान फलंदाजांना हेल्मेट घालणे अनिवार्य करायला हवे.
तेंडुलकरने सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू विजय शंकरचा व्हिडिओ शेअर केला. त्याच्या डोक्यावर चेंडू लागला होता. किंग्स इलेव्हन पंजाबचा क्षेत्ररक्षक निकोलस पुरनने फलंदाजाच्या एंडला चेंडूफेक करीत फलंदाजाला धावबाद करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ही घटना घडली.
सुरुवातीला इंडियन प्रीमियर लीगच्या अधिकृत व्हेबसाईटवर टाकलेल्या या व्हिडिओमध्ये चेंडू लागल्यानंतर शंकर मैदानावर पडला असून त्याची तपासणी करण्यासाठी फिजिओला मैदानात यावे लागले होते. नशिबाने फलंदाजाने हेल्मेट घातले असल्यामुळे दुर्घटना टळली. तेंडुलकरने ट्विट केले, ‘खेळ वेगवान होत आहे, पण सुरक्षितही होत आहे? अलीकडेच आपण एक घटना बघितली. त्यात धोकाही होऊ शकला असता. फिरकीपटू असो किंवा वेगवान गोलंदाज व्यावसायिक पातळीवर फलंदाजाला हेल्मेट घालणे अनिवार्य करायला हवे. आयसीसीने याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन सचिनने केले आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियात स्थानिक सामन्याद-रम्यान सीन एबटचा चेंडू लागल्यामुळे फलंदाज फिलप ह्यूजचा दु:खद अंत झाला आहे.