दुबई : यूएईतील मैदानावर आयपीएलची रंगत सुरू आहे. हे वृत्त लिहीपर्यंत २३ सामने पूर्ण होत आहेत. आता ती वेळही येत आहे की खेळाडू एका संघातून दूसऱ्या संघात जाऊ शकतील. बीसीसीआयनेच नियम केला असून आयपीएलच्या मिड सीझनमध्ये फ्रॅन्चायझी खेळाडूंची अदलाबदली करू शकतील.
कुठला खेळाडू योग्य?
जो खेळाडू कुठल्या फ्रॅन्चायझीसाठी आयपीएल २०२० मध्ये एकही सामना खेळला नाही किंवा दोन किंवा त्यापेक्षा कमी सामने खेळला आहे तो ट्रान्सफरसाठी योग्य आहे.
केव्हा होणार मिड सीझन ट्रान्सफर?
आयपीएलच्या प्रत्येक संघाला साखळी फेरीत १४-१४ सामने खेळायचे आहेत. मिड सीझन ट्रान्सफर विंडो ७-७ सामन्यांनंतर खुली होईल. आतापर्यंतचा विचार करता केवळ दोन संघ ६-६ सामने खेळले आहेत. उर्वरित संघांचे काही सामने शिल्लक आहेत.
कुठल्या दिग्गजांचा समावेश?
या प्रक्रियेत समावेश असलेल्या खेळाडूंची यादी मोठी आहे आणि संघांची नजरही या दिग्गज खेळाडूवर केंद्रित झालेली असेल. त्यात अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा (दोघेही दिल्ली), सौरभ तिवारी (मुंबई), ख्रिस जॉर्डन, ख्रिस गेल (दोन्ही पंजाब), उमेश यादव, डेल स्टेन (दोन्ही आरसीबी), इम्रान ताहीर (सीएसके), रिद्धिमान साहा (हैदराबाद) आदींचा समावेश आहे.