Join us

IPL 2020: हार्दिक पांड्या गोलंदाजी करेल, पण...; झहीर खानने दिली महत्वाची माहिती

आरसीबीविरुद्ध तरी हार्दिक गोलंदाजी करणार का, असाच प्रश्न चाहत्यांना सतावत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 13:06 IST

Open in App

मुंबई : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Banglore) यांच्यात आज तुंबळ लढाई पाहण्यास मिळेल. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक विजय आणि एक पराभव पत्करलेला आहे. त्यातही मुंबईची बाजू काहीशी चांगली आहे, कारण त्यांनी आपला अखेरचा सामना जिंकला आहे, तर आरसीबीला आपल्या अखेरच्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळेच मुंबईचे पारडे वरचढ मानले जात आहे. त्याचवेळी, मुंबईच्या पाठिराख्यांना प्रश्न पडला आहे तो हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya). कारण मुंबईने आतापर्यंत खेळलेल्या आपल्या दोन्ही सामन्यात हार्दिकने गोलंदाजी केलेली नाही, त्यामुळेच आरसीबीविरुद्ध तरी हार्दिक गोलंदाजी करणार का, असाच प्रश्न चाहत्यांना सतावत आहे.

हार्दिकच्या गोलंदाजीबाबत मुंबई इंडियन्सचे क्रिकेट संचालक झहीर खान (Zaheer Khan) यांनी सांगितले की, पुढील काही सामन्यांत हार्दिक गोलंदाजी करताना दिसून येईल. पण त्याची तंदुरुस्तीही महत्त्वाची आहे.’ हार्दिक भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून ओळखला जातो. २०१९ साली झालेल्या पाठदुखीमुळे त्याच्या कारकिर्दीला वळण लागले आणि त्याची कामगिरी खालावली. यादरम्यान अनेक महिने तो टीम इंडियाबाहेर राहीला. त्यामुळेच आता त्याच्यावरील वर्कलोड कमी करण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सने घेतला आहे.

आरसीबीच्या सामन्याआधी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये झहीर खानने सांगितले की, ‘आम्ही आशा करतोय की, पुढील काही सामन्यांमध्ये हार्दिक गोलंदाजी करेल. कारण कोणत्याही संघाच्या फलंदाजीला हादरे देण्याची त्याची क्षमता आहे. मात्र त्याचवेळी आम्हाला त्याच्या शरीराची हाकही ऐकावी लागेल. त्यामुळेच संघाच्या फिजिओसह आमची सातत्याने चर्चा सुरु आहे.’

टॅग्स :हार्दिक पांड्यारॉयल चॅलेंजर्स बेंगलोरIPL 2020