शारजाह : केकेआरकडे अनेक मॅचविनर खेळाडू असल्यामुळे फलंदाजीत प्रमोशन मिळणे कठीण असल्याचे इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इयोन मोर्गन याने म्हटले आहे. मोर्गन सध्या संघासाठी ‘फिनिशर’ची भूमिका वठवित आहे.
दिल्लीविरुद्ध मोर्गन सहाव्या स्थानी फलंदाजीला आला. त्याने १८ चेंडूत ४४ धावा केल्या, तरीही संघाचा १८ धावांनी पराभव झाला. त्याआधी आंद्रे रसेल व दिनेश कार्तिक हे अपयशी ठरले. उशिरा फलंदाजीला आला का, असा प्रश्न करताच मोर्गन म्हणाला, ‘मी असा विचार करत नाही. आमच्याकडे अनेक मॅचविनर आल्यामुळे वरच्या स्थानावर फलंदाजी करणे कठीण आहे.आंद्रे रसेलसारखा विश्वस्तरीय अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे स्वाभाविकपणे त्याला आधी पाठवणे गरजेचे आहे. ’
केकेआरच्या डावाची सुरुवात करणारा सुनील नरेन आतापर्यंत तरी दमदार सुरुवात करून देण्यात अपयशी ठरला. मोर्गनने मात्र नरेनचा बचाव केला. पराभवानंतरही अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या. सुनील नरेन लवकरच मॅचविनर खेळी करेल, अशी अपेक्षा मोर्गनने व्यक्त केली.